Polling Day : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबरला मतदान झालं आहे. राज्यात सर्वच ठिकाणी शांततेत मतदान पार पडलं. राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान करण्यासाठी नागरिक बुथवर गर्दी करून होते. मात्र काही ठिकाणी ईव्हीएम मशीनच बंद पडले. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. राजकीय नेत्यांनी प्रशासनावर बेजबाबदारीपणाचा आरोप लावला आहे. निवडणूक आयोगाने पुरेशी तयारी न करताच निवडणूक घेतली. वेळेवर पोलिंग अधिकारी बदलले. अनेक मतदारांची नावं मतदार यादीतून गायब आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती असल्याचा आरोप काँग्रेस नेते आमदार डॉ. नितीन राऊत यांनी केला आहे.
नागपुरात काही मतदान केंद्रात अडीच तासांपर्यंत मतदान थांबले होते. ईव्हीएम खराब झाल्याने मतदान ठप्प झाले. मतदान केंद्रावर वाया गेलेला वेळ संध्याकाळी सहानंतर वाढवून देण्यात यावा, अशी मागणीही डॉ. राऊत यांनी केली. नागपूर शहर पोलिसांवर दंडूकेशाहीचा आरोप त्यांनी केला. नागपूर शहर पोलिस भाजप उमेदवारच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राऊत यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बूथ लावण्यापासून रोखल्याबद्दल संताप व्यक्त केला.
यंत्रात बिघाड
नागपुरात काही मतदान केंद्रांवर अडीच तासांपर्यंत मतदान थांबले होते. ईव्हीएम खराब झाल्याने हा प्रकार घडला. त्या मतदान केंद्रांवर अनेकांचा वेळ वाया गेला. हा वेळ सायंकाळी सहानंतर वाढवून देण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातही ईव्हीएम मशीन बंद पडले. या बूथवर असलेले ईव्हीएम मशीन हे इनव्हॅलिड दाखवत असल्याचे आढळले. त्यामुळे मालेगावातील अनेक मतदार ताटकळत होते. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात अनेक नागरिक सकाळ पासूनच मतदान केंद्रावर रांगा लावून होते. मात्र ईव्हीएम बंद असल्याने नागरिकांचा खोळंबा झाला.
नाशिकमधील पंचवटी परिसरातील सोनुबाई केला मतदान केंद्रावरील तांत्रिक निर्माण झाला. बिघाडामुळे नाशिकमधील मतदान 20 मिनिटांपर्यंत उशिरा झाले. जळगावच्या जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन सुरू होत नव्हते. त्यामुळं गोंधळ झाला. ईव्हीएम मशीन सुरू होत नसल्यामुळे मतदान मिनिट थांबले होते. ईव्हीएम सुरू व्हावे, यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांची मदत घेतली गेली. त्यानंतर मशीन सुरू झाल्यावर त्याला सील करण्यात आलं. नागपूर, मुंबई, जळगाव, कोल्हापूर अशा ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याची घटना घडली. ज्येष्ठ नागरिकांसोबत तरुणांनी सुद्धा याबाबत तक्रार केली.