Crop Insurance : खरीपाच्या हंगामात शेतकरी बांधवांसाठी खुशखबर पुढे आली आहे. रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीचा पीकविमा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलेले आंदोलने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. गतवर्षीच्या खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते. आता या नुकसानीची भरपाई विमा स्वरूपात मिळू लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या झालेल्या नुकसानीचा पिकविमा शेतकऱ्यांना मिळावा म्हणून रविकांत तुपकरांनी सातत्याने आंदोलने केली होती. चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे त्यांनी अन्नत्याग आंदोलन केले. त्यानंतर मुंबई येथील मंत्रालयात ताबा आंदोलन केले. त्यावेळी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पिकविमा देण्याची मागणी मान्य झाली होती.
परंतु रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांसह रविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा नागपूर अधिवेशनावर धडक दिली होती. त्यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पिकविमा देण्याचे त्यांनी मान्य केले होते. त्यानंतर पिकविम्याची काही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली पण हजारो शेतकरी पिकविम्यापासून वंचित होते. त्यामुळे रविकांत तुपकरांनी 12 जूनला पुन्हा एकदा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन पिकविम्याची मागणी लावून धरली व कृषी विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर कृषिमंत्र्यांनी पिकविमा कंपनीला आदेश दिले. आता लवकरच पिकविमा जमा करण्याचे कंपनीने मान्य केल्याने रविकांत तुपकरांच्या आंदोलन व पाठपुराव्याला यश आले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रविकांत तुपकरांच्या आंदोलन व पाठपुराव्याला यश आले असून यामुळे काही ना काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तुकरांची मागणी पूर्ण
दरम्यान कमी शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा जमा करून कंपनीने शेतकऱ्यांची बोळवण करू नये, संपूर्ण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पिकविम्याची रक्कम जमा करावी, अशी आग्रही मागणी रविकांत तुपकरांनी केली आहे. गतवर्षीच्या खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिक नुकसानीचा मोबदला आणि पिकविमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.