Yavatmal washim constituency : आधी वाशीम व नंतर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी राजकीय क्षेत्रातील दिग्गजांना अस्मान दाखवत पाच वेळा निवडणुकीचे मैदान जिंकले.खरे पाहता पंचवीस वर्षांचा खासदारकीचा प्रवास सोपा नव्हता. म्हणूनच ‘नशीबवान’ असा भावनाताईंचा उल्लेख होऊ लागला. त्यातच रक्षाबंधनाला आवर्जून राखी पाठवून त्यांनी मतदारसंघात बंधुप्रेमाची ओळख निर्माण केली. शिवसेनेच्या कथीत उठावात त्यांनी जिवाभावाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधली.मात्र, पुन्हा एकदा ‘झाशी’ लढविण्यासाठी सज्ज झालेल्या भावनाताईंना भाजप- शिवसेनेच्या राजकीय डावपेचात भावांनी अक्षरशः तोंडघशी पाडले.
वाशिम लोकसभा मतदारसंघाने काश्मीरमधील युवा नेते गुलाम-नबी आझाद यांना भरघोस मताने निवडून दिले.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक त्यावेळी त्यांच्या पाठीशी होते. मात्र, त्याच सुधाकररावांना शिवसेनेच्या पुंडलिक गवळी (रिसोड ) यांनी पराभूत केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी वाशिम जिल्ह्याची घोषणा करून गवळींच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली.पुढे गवळींच्या निधनानंतर सुधाकररावांनी शिवसेनेच्या डॉ.ज्ञानेश्वर शेवाळे यांना पोटनिवडणुकीत धूळ चारली.त्यानंतर 1999 मध्ये दिवंगत पुंडलिक गवळी यांच्या कन्या भावना गवळी यांनी धडाडीने लोकसभेच्या मैदानात उडी घेतली.माजी खासदार अनंतराव देशमुख यांचा त्यांनी पराभव करून सर्वांनाच चकित केले व अवघ्या पंचेविशीत त्यांनी लोकसभेत प्रवेश मिळविला. नवख्या युवा खासदार म्हणून त्यांची प्रतिमा देशात वलयांकित झाली.
दरम्यान, नाईक घराण्यातील तिसऱ्या पिढीचे शिलेदार व राजकीय धुरंधर मनोहरराव नाईक विरोधात उतरले. 2004 मध्ये ‘भाऊ’ विरुद्ध ‘ताई’ असा सामना रंगला आणि ताईंनी तो लिलया जिंकला.पुढील तीन निवडणुकांत भावनाताईंनी विजयी मालिका कायम राखली. त्यांनी काँग्रेसचे हरिभाऊ राठोड,शिवाजीराव मोघे,माणिकराव ठाकरे या ‘हेवी वेट’ नेत्यांना पराभवाची धूळ चारली. सुरुवातीच्या तीन निवडणुकांमध्ये ताईंची हवा असली तरी नंतरच्या दोन निवडणुकांत कामगिरी फारशी चांगली नसताना मोदी लाटेने त्यांना तारले.
Lok Sabha Election : भावना गवळी यांच्या पाठिशी उभा राहिला हा खमक्या नेता
पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात खासदार भावना गवळी यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची यादी निरंक असली तरी नांदेड- सेवाग्राम रेल्वे मार्गाची परिपूर्तीही त्यांना करता आली नाही.त्यांचा जनसंपर्कही पुढे संपत गेला.कार्यकर्त्यांचा गोतावळा दुरावला.शिवसेनेचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी असलेला वाद विकोपाला गेला.त्यातच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेचे दोन भाग झाले. ‘ईडी’च्या भीतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
शिवसेनेच्या गोटात भावना गवळीही सामील झाल्या.त्यांच्या लोकसभेतील सहाव्यांदा उमेदवारीचा राजकीय भावांकडून ताईंना शब्द मिळाला. ‘मेरी झांसी नही दूंगी’ या घोषणेसह त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार केला.पण…. हाय रे भावा… उमेदवारी मिळविण्याच्या लढाईत ‘ताईं’ चा घात झाला. उमेद बाळगून असलेल्या ताईंच्या पदरी
भाजपाच्या सर्वेक्षण अहवालामुळे भोपळा आला. आता ताई, ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक’
म्हणत धनुष्यबाणाचा तीर कुठे सोडतात,हे लोकसभेच्या रणांगणात लवकर कळेलच !