Monsoon Effect : काही दिवसांपूर्वी नागपूरला पाण्यात बुडविणाऱ्या मुसळधार पावसाने सोमवारी (ता. 19) पुन्हा उपराजधानीतील नागरिकांची दाणादाण उडविली. अवघ्या अर्धा तासाच्या पावसाने शहरातील अनेक भाग जलमय झालेत. मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक भागातील वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली. अशातच जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या सरकारी बंगल्यातही पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे येथे सुरू असलेली बैठक गुंडाळावी लागली.
नागपूरला सोमवारी सकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. अनेक दिवस पावसाने दांडी मारल्याने नागपूरकर उकाड्याने त्रस्त झाले होते. अशातच सोमवारी सकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. सुमारे अर्धा तासापर्यंत मुसळधार पावसाने नागपूरला झोडपून काढले. त्यामुळे शहरातील अनेक मार्ग पाण्याखाली गेले. अनेक भागातील वाहतूक विस्कळीत झाली. नागपूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांच्या बंगल्यात सुरू असलेल्या बैठकीलाही याचा फटका बसला.
महापालिकेवर नाराजी
जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या बंगल्यास सोमवारी सरपंचांची बैठक सुरू होती. अशात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे उपस्थितांची चांगलीच तारांबळ उडाली. सुमारे अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांच्या नाकीनऊ आणले. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सरपंचांनी यामुळे नागपूर महापालिकेवर टीका केली. नागपूर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अख्खे शहर पाण्याखाली जात आहे. आता त्याचा फटका सरकारी विभागांनाही बसत आहे. यापूर्वीही मुसळधार पावसामुळे नागपुरातील अनेक सरकारी कार्यालयांमध्ये पाणी शिरले आहे.
Assembly Election : जिंकण्याच्या लढाईत नवनवीन डावपेचांना उधाण
नागपुरातील अनेक भागात सिमेंटचे रस्ते (Cement Road) झाले आहेत. मात्र पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसल्याने अनेक भागांमध्ये पाणी साचते. लोकांच्या घरात पाणी शिरत असल्याने आता नागपुरातील सिमेंटीकरणाविरोधात विरोधी पक्षांनी आंदोलन सुरू केले आहे. लोकसभा (Lok sabha) निवडणुकीतही सिमेंट रस्त्यांमुळे येणाऱ्या पुराचा मुद्दा प्रचारात गाजला होता. परंतु मतदारांनी त्यानंतही नितीन गडकरी यांना कौल दिला.
विधानसभा निवडणुकीतही मतदार भाजपलाच (BJP) कौल देतील याची शाश्वती नाही. त्यामुळे मान्सूनचा पाऊस भाजपवर विजेसारखा कोळण्यापूर्वी नागपुरात पूर व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. नागपुरातील लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात तातडीने उपापय करणे गरजेचे झाले आहे. सद्य:स्थितीत पुन्हा एकदा काँग्रेसने (Congress)नागपुरातील पावसाच्या मुद्द्यावर आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. त्याला महाविकास आघाडीतील इतर पक्षही साथ देत आहेत. त्यामुळे नागपूर शहरातील पावसामुळे येणाऱ्या पुराचा मुद्दा भाजपने अत्यंत गांभीर्याने घेणे आता गरजेचे झाले आहे. अन्यथा त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.