नवनवीन योजनांमधून जनतेला खुश करण्याचे काम सरकार करीत आहे. मात्र भविष्यातील पिढीकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत सरकारची उदासीनता आता जाहीर झाली आहे. याची प्रचिती भंडाऱ्यात येत आहे. अर्धे शैक्षणिक वर्ष संपले तरी अद्यापही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत. राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांना नवीन गणवेश देण्याची घोषणा केली. परंतु, अर्धे शैक्षणिक सत्र संपले तरी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मिळाले नाहीत. गरीब विद्यार्थ्यांची थट्टा चालवली आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पंचायत समिती कार्यालयात गणवेश आले आहेत, अशी माहिती प्राप्त झाली. परंतु ते विद्यार्थ्यांना वितरित का करण्यात येत नाहीत याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. गणवेश निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे तर असे केले जात नाही, अशी शंकाही व्यक्त होत आहे.
राज्य शासनाने ‘एक राज्य एक गणवेश’ हे धोरण निश्चित केले. शैक्षणिक सत्र 2024-25 पासून विद्यार्थ्यांना मिळणारे दोन्ही गणवेश शाळेच्या पहिल्या दिवशी मिळतील असे परिपत्रक काढले. परंतु, अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही. तुमसर पंचायत समिती कार्यालयात गणवेश आल्याची माहिती काही पालकांनी व लोकप्रतिनिधींनी दिली. याबाबत भ्रमणध्वनीवर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची संपर्क साधला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
अद्यापही जुने-फाटके गणवेशात
शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा शब्द राज्य शासनाने दिला. राज्य शासनाने जिल्हा परिषद, नगर परिषद तसेच इतर सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश योजना सुरू केली आहे. परंतु शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी अजूनपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. त्यामुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना जुन्या-फाटक्या गणवेशावर शाळेत जावे लागत आहे. आम्हाला गणवेश कधी मिळेल असा प्रश्न विद्यार्थी आपल्या शिक्षकांना करीत आहेत.
अर्धे शैक्षणिक सत्र निघून गेले तरीसुद्धा चिमुकल्या विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा करावी लागत आहे. पंचायत समिती कार्यालयात गणवेश आल्याची माहिती काही पालकांनी दिली. परंतु ते गणवेश शाळेपर्यंत का गेले नाहीत असा प्रश्न येथे उपस्थित होतो. आदेश आल्याशिवाय पंचायत समितीमधील शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी विद्यार्थ्यांना गणवेश देऊ शकत नाहीत. शासनाने कापड, शिलाई खर्च, टेंडर प्रक्रिया या सर्वबाबतीत अडचण निर्माण झाल्याने गणवेश कुठे अडकले हे कळत नाही. खासगी शाळेतील मुलांचे गणवेश बघून सरकारी शाळेतील विद्यार्थी शिक्षकांना आम्हाला गणवेश केव्हा मिळेल असा प्रश्न करीत आहेत.