Young Voter : विदेशात शिक्षण घेणाऱ्या एका तरुण विद्यार्थ्याने राष्ट्रीय कर्तव्याचे भान जोपासात मतदानासाठी सिंगापूरवरून अकोला गाठले. आपले कर्तव्य निभावले. आता निवडणूक आटोपल्याने हा तरुण पुन्हा शिक्षण घेण्यासाठी परत जाणार आहे. केवळ उदासीनतेमुळे मतदान न करणाऱ्यांना या तरुणाने आदर्श संदेश दिला आहे.
शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने गाव सोडून जाणारे मतदानाकडे पाठ फिरवतात. मतदान करून अनेकदा अशांपुढे ज्येष्ठ नागरिक आदर्श निर्माण करतात. अशात अकोल्यात एक विद्यार्थी असाही आहे, जो मतदानासाठी सिंगापूरहून अकोल्यात आला. लोकशाहीच्या उत्सवात सहभागीही झाला. परिमल असनारे असे या युवकाचे नाव आहे. तो अकोला येथील मूळ रहिवासी आहे. शिक्षणानिमित्त परिमल सिंगापूर येथे गेला आहे. अकोल्यात लोकसभा निवडणूक होती. त्यामुळे मतदानासाठी जायचे असे परिमलने ठरवले होते.
नियोजन करून प्रवास
मतदान करायचे असल्याने परिमल याने सगळे नियोजन केले होते. सिंगापूर येथून लगेच अकोला गाठणे शक्य नसते. त्यामुळे विमान तिकीट परिमल याने काढून ठेवले. भारतात पोहोचल्यावर अकोलापर्यंत काही टप्प्यात प्रवास केला. निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे शुक्रवारी (ता. 26) अकोला लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू झाले. त्यावेळी परिमल याने सिव्हिल लाइन्स मार्गावर असलेल्या एलआरटी महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान केले.
प्रत्येकाने मतदान करावे. लोकशाही मजबूत करावी. सिंगापूरवरून येत मी मतदान केले आहे. सर्वांनी मतदान करावे असे आवाहन परिमल याने केले.
असाही उत्साह
अकोला येथे मतदान करणाऱ्यांना मोफत चहा, नाश्ता आणि सवलतीच्या दरात जेवण देण्यात आले. दिव्यांगांना ऑटो संघटनेकडून मोफत सेवा देण्यात आली. डॉ. पूजा खेतान यांच्याकडून मतदान करणाऱ्यांना मोफत नेत्रतपासणीचा लाभ देण्याची घोषणा केली. अकोल्यातील एका दुकानदाराने शाई दाखवा आणि मोफत केस कापून घ्या, अशी मोहीम सुरू केली. अनंत कोळकर असे या सलून चालकाचे नाव आहे.
वेब कास्टिंग सुविधा
अकोला लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रांपैकी 50 टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात आले. एक हजार 38 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगने देखरेख करण्यात आली. अकोट विधानसभा मतदारसंघातील 168, बाळापूर मतदारसंघात 170, अकोला पश्चिम मतदारसंघात 160, अकोला पूर्व मतदारसंघात 177, मूर्तिजापूरमध्ये 193 आणि रिसोड मतदारसंघात 170 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात आली व ऑनलाईन देखरेख ठेवण्यात आली.