Assembly Election : धरणे, मोर्चा, आंदोलन, अधिवेशन आणि निवडणूक म्हटली की सर्वाधिक ताण असतो पोलिसांवर. सण, उत्सव काहीही असो ‘खाकी’ घालून ‘ऑन ड्यूटी 24 तास’ असणाऱ्या पोलिसांना आपलं कर्तव्य पूर्ण करावंच लागतं. सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक सुरू आहे. विदर्भात राजकीय दृष्टीनं सर्वांत ‘हॉट डेस्टिनेशन’ सध्या नागपूर आहे. नागपूरच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात प्रचंड वजन असलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे नागपुरातून निवडणूक लढत आहेत. फडणवीस यांचे अनेक नीकटवर्तीय निवडणूक रिंगणात आहेत. त्याला महाविकास आघाडी तगडी टक्कर देत आहे. त्यामुळं एकापाठोपाठ ‘हाय प्रोफाइल’ नेते उपराजधानीत प्रचारासाठी येत आहेत. नेत्यांच्या सततच्या दौऱ्यामुळं सध्या नागपूर पोलिसांची झोप उडाली आहे.
डोळ्यात तेल घालून नव्हे तर तेलात डोळे बुडवून पोलिस आपलं कर्तव्य बजावत आहे. या सर्व धावपळीत नागपूर पोलिसांसाठी 17 नोव्हेंबरचा रविवार ‘हाय टेन्शन’ दिवस ठरला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नागपुरात होते. मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यानं ते नियोजित दौरा रद्द करून दिल्लीला निघून गेले. तरीही पोलिस ‘रिलॅक्स’ नव्हते. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा रोड-शो नागपुरात होता. भाजपसाठी कंगना रणौत प्रचार करणार होता.
प्रचंड बंदोबस्त
कंगना रणौत आणि प्रियंका गांधी एकाच वेळी नागपुरात होत्या. त्यातल्या त्यात कंगना या संवेदनशील परिसरात शक्तीप्रदर्शन करणार होत्या. प्रियंकाही संघ मुख्यालयाजवळून जाणार होत्या. त्यामुळं अख्खं नागपूर पोलिस दल रस्त्यावर होतं. यात पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी केलेल्या बंदोबस्ताच्या व्यूहरचनेची चर्चा नागपुरात बऱ्यापैकी होती. उपायुक्त मदने हे पूर्णवेळ स्वत: बंदोबस्तासाठी रस्त्यावर होते. सभा स्थळावरील त्यांनी केलेला बंदोबस्त चर्चेचा विषय होता. दुभाजक उभारून त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीला ‘आधे इधर, आधे उधर’ असं ठेवलं होतं.
उपायुक्त मदने यांच्या मदतीला तब्बल पाच पोलिस निरीक्षक होते. अतिरिक्त पोलिस आयुक्तही या भागात होते. वाहतूक शाखेचे उपायुक्त अर्चित चांडक हे देखील आपल्या ताफ्यासह याच भागात तळ ठोकून होते. नागपूर शहर पोलिस दलाचा मोठा ताफा येथे होताच. पण त्यांच्या मदतीला निवडणूक आयोगानं बंदोबस्तासाठी पाठविलेले सशस्त्र निमलष्करी दलही होते. पोलिसांकडून ‘चप्प्या चप्प्या’वर नजर होती. उंच इमारतींवरही पोलिस तैनात होते. साध्या वेशातही पोलिस फिरत होते. रस्त्याच्या अलीकडे एकीकडे स्वत: उपायुक्त मदने उभे होते. पलीकडे उपायुक्त अर्चित होते. त्यामुळे दोन दोन डीसीपी आणि प्रचंड मोठा बंदोबस्त पाहून सगळ्यानाच ‘कायदे में रहेंगे तो फायदे में रहेंगे’ असंच वाटलं.