Krushi Utpanna Bajar Samiti : बुलढाणाच्या मलकापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवचंद्र तायडे (भाजप), यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या दुसऱ्या गटाने अविश्वासाचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे सादर केला होता. 31 मे रोजी त्याचा निकाल लागत असताना एकाच पक्षाचे दोन गट एकमेकांना भिडले. या दरम्यान प्रचंड नारेबाजी करण्यात आली. वाद विकोपाला गेला व दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. ही घटना घडताच पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पळविले. या घटनेत 3 पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी ताबडतोब कारवाई करीत, दोन्ही गटातील 200 च्या जवळपास पदाधिकारी आणि कार्यक्रत्यांवर विविध गुन्हे नोंदविले आहेत.
बाजार समितीतील 16 पैकी 14 संचालकांनी 21 मे रोजी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. सभापती शिवचंद्र तायडे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. या निर्णयासाठी बैठक बोलावण्यात अली होती. यामध्ये 13 विरुद्ध 2 अश्या मतांनी अविश्वास ठराव पारित झाला. अवघ्या एका वर्षातच सभापती तायडे यांना पायउतार करण्यात आले. दरम्यान दोन्ही गटांचे अनेक कार्यकर्ते समोरासमोर आले आणि दोन्ही समर्थकांकडून नारेबाजी करण्यात आली. दगफेकीच्या घटनेनंतर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
आदेशाचे उल्लंघन
या घटनेत गैरकायद्याची मंडळ जमून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. संचालकांची गाडी अडवली व धक्का बुक्की करून दगडफेक केली. यावेळी 3 पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी 9 पदाधिकाऱ्यांसह 150 ते 200 कार्यकर्त्यांवर विविध कलमान्वय गून्हे दाखल करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी मलकापुर यांनी कलम 144(1) जाफौ प्रमाणे, तसेच बुलढाणाच्या जिल्हाधिकार्यांचे कलम 37 (1) महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे जमाव बंदीचे आदेश जिल्हयात लागू आहे. 27 मे सकाळी 6 वाजता पासुन ते 10 जून रात्री 12 वाजता पर्यंत हे आदेश लागू करण्यात आले आहे.
संपुर्ण बुलढाणा जिल्हयात उपविभागीय दंडाधिकारी (मलकापुर) आणि जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश लागु असताना दगडफेक झाली. आदेशांचे उल्लंघन केले तसेच पोलीसांच्या आदेशाला न जुमानता गैरकायद्याची मंडळी जमवुन बाजार समितीच्या लक्झरी बस समोर, “शिवचंद्र तायडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है”, अशा नारेबाजी करुन वाहन अडविले. गाडीवर धक्का बुक्की केली तसेच जिल्हा मध्यवर्ती केंद्रीय सहकारी पतसंस्थाच्या बाजुला असलेल्या बोळीतुन दगडफेक केली. या घटनेत दंगा काबू पथकातील पोलीस कर्मचारी शेख फैजल शेख खलील, संचिन संजय कवळे, प्रकाश भगवान जाधव यांना दगड लागल्याने किरकोळ जखमी झाले आहेत.
या प्रकरणी ईश्वर वर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, पोलिसांनी आरोपी विजय कडू पाटील, अजय पुरूषोत्तम तायडे, केशव गारमोडे, अमोल वामनराव तायडे, चंद्रशेखर रमेश तायडे, शंभू शिवचंद्र तायडे, राजू मधुकर तायडे, सागर मनोज जैस्वाल, राहुल घाटे व अज्ञात 150 ते 200 जणांवर अप. नंबर 265/2र कलम 188, 341, 143, 147 149 सह कलम 135 मपोका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची पुढील तपासणी मलकापूर पोलीस करीत आहे.