बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे गाव जगप्रसिध्द आहे ते येथील खाऱ्या पाण्याच्या सरोवरामुळे. मात्र याच जगप्रसिद्ध सरोवर नगरीत अवैध औषधाचा मोठा साठा आढळून आला आहे. 24.33 लाखांचा अवैध औषधांचा अवैध साठा जप्त करण्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने लोणार यांनी यश आले आहे. कामोत्तेजक औषधांसह गर्भपातासाठी वापरल्या जणाऱ्या प्रतिबंधित करण्यात आलेल्या औषधांचा यामध्ये समावेश आहे.
लोणार येथील चंदन मेडिकल स्टोअर्समध्ये पथकाने तपासणीस केली. त्यांच्याकडे कामोत्तेजक औषधे आढळली. सुमारे 8 हजार 225 रुपयांचा साठा ‘नमुना 15’ गुरुवारीच प्रतिबंधित करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयातील औषध निरीक्षक गजानन प्रल्हाद घिरके यांना लोणार येथे अवैधपणे औषध साठवणूक केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
माहितीच्या आधारे वाशिम येथील अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक एम. व्ही. गोतमारे यांच्यासमवेत पथकाने लोणार गाठले. चंदन मेडिकोजच्या मागील एका खोलीत चौकशीत विनापरवाना औषध साठवून ठेवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी तेथे उपस्थित असलेल्या सुशील पूनमचंद दरोगा यांच्या ताब्यातून हा 24.33 लाखांची औषषी जप्त करण्यात आली आहे. या साठ्यातील एक नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला आहे.
संचालकांना कडक ताकीद..
या कारवाईनंतर जिल्ह्यातील सर्व मेडिकल स्टोअर संचालकांना कडक ताकीद देण्यात आली आहे. झोपेच्या गोळ्या, गर्भपाताची औषधे तसेच नशा येणारी औषधे व सर्व अॅलोपॅथिक औषधे त्यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ग्राहकांना देऊ नयेत. प्रत्येक औषधाचे विक्री बिल ग्राहकांना देण्यात यावे. त्याचे उल्लघंन केल्याचे आढळल्यास औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्या नियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (औषधे) गजानन घिरके यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मेडिकल स्टोअर्स चालकांना दिला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग अमरावती येथील सह आयुक्त (औषधे) मिलिंद कालेश्वरकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे.