महाराष्ट्र

Nana Patole : मुंबईबाबत मोदींनी दाखविलेले स्वप्न फसवे

Congress : पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

Narendra Modi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मुंबईबाबत अनेक स्वप्न दाखविले आहेत. मोदींनी दाखविलेली ही स्वप्ने भ्रामक आणि फसवी असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली. मोदींच्या दौऱ्यासंदर्भात पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबईतील 29 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांनी सांगिलेले मुद्दे पटण्यासारखे नाहीत, असे पटोले म्हणाले.

भाजपा सरकारने गेल्या दहा वर्षांत मुंबई व महाराष्ट्राचे सर्वच बाबतीत खच्चीकरण केले आहे. मुंबईतील जागतिक वित्तीय केंद्रासह अनेक महत्वाच्या कंपन्यांचे कार्यालय, प्रकल्प गुजरात, इतर राज्यात पळविण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून सर्वांत जास्त कर दिल्लीला दिला जातो. मात्र राज्याला परतावा देताना भेदभाव केला जातो. विधानसभा निवडणूक (Assembly Election) जवळ आल्याने मोदी पुन्हा फेकाफेकी करीत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले.

राज्य माघारलेलेच

महाराष्ट्र प्रगती करत आहे, असे सांगितले जाते. केंद्र सरकारच्या आकडेवारीवरूनच महाराष्ट्र पिछाडीवर असल्याचे दिसते. दरडोई उत्पन्नात राज्याचा अकरावा क्रमांक आहे. निर्यातीच्या बाबतीत महाराष्ट्र मागे आहे. परकीय गुंतवणूक नाही. रोजगार निर्मितीतही महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत मागे आहे. महाराष्ट्रात लाखो रोजगार निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. बेरोजगारांची संख्या पाहता मोदींच्या दाव्यात काहीच दम नाही, हे स्पष्ट होते. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे. त्यानंतरही त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या बंदरामुळे केवळ अदानीचा (Adani) फायदा होणार आहे, असे ते म्हणााले.

वाढवण बंदरांमुळे मच्छिमारांचा व्यवसाय बंद पडणार आहे. महाराष्ट्राने प्रगती करावी, असे मोदींना वाटत असते तर महाराष्ट्रातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात पळवले नसते. मोदींनी आजच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांसह, महापुरुष, संतांची नावे घेतली. महाराष्ट्राला थोर संत महापुरुषांची परंपरा लाभलेली आहे. पण त्यांचा अपमान भाजप नेतेच सातत्याने करीत असतात. निवडणूक आली की, महापुरुषांची भाजपला आठवण येते. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्याने आता विधानसभा निवडणुकीत पराभव होईल अशी भीती भाजपला आहे. या भितीने महापुरुष, संतांचे स्मरण मोदींनी केले. अरबी समुद्रातील शिवस्मारक व इंदू मील मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम अद्याप झालेले नाही, याचा विसर कदाचित मोदींना पडला असावा, असेही प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!