Bhandara Gondiya constituency : हवामान खात्याने पुढील पाच दिवस विदर्भासह भंडाऱ्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. याशिवाय गुढीपाडव्याला गारपिटीचीही शक्यता आहे. त्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पुढील आठवड्यात नेत्यांसोबतच ढगही गरजतील, अशी स्थिती आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना रिंगणात उतरविले आहे, तर काँग्रेसने नवा चेहरा म्हणून डॉ. प्रशांत पडाळे यांना संधी दिली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हा सामना एकतर्फी असल्याची चर्चा होती; पण जसजशी निवडणूक प्रचारात रंगत येत आहे तसतशी दररोज समीकरणे बदलत चालली आहेत.महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आता मोठ्या नेत्यांच्या सभा होऊ घातल्या आहेत. भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या निवडणूक प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचारसभा ८ एप्रिलला झाली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासुद्धा सभा दोन-तीन दिवसांत होणार आहेत, तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या निवडणूक प्रचारार्थ 13 एप्रिलला काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा होऊ घातली आहे, तर काँग्रेसच्या राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांच्या सभा होणार आहे. या सभांच्या माध्यमातून निवडणुकीत आपापल्या पक्षाच्या उमेदवारासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे प्रचारसभांनी निवडणुकांचा कल बदलेल का याची चर्चा आहे. सध्या तरी प्रचारात दोन्ही उमेदवारांनी जोर धरल्याचे चित्र आहे.
Lok Sabha Election : सरकारे दम पे चलती है ! योगी आदित्यनाथांचा कोणाला इशारा?
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांतच थेट लढत होणार आहे, तर या निवडणुकीत घटक पक्षाच्या नेत्यांची प्रतिष्ठासुद्धा पणाला लागली आहे. महायुतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल हे मागील तीन दिवसांपासून या मतदारसंघात सभा, बैठका, मेळावे घेऊन मोर्चेबांधणी करीत आहेत. तर,प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा आपल्या व्यस्त दौऱ्यातून वेळ काढून महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी स्वतः लक्ष घालून मोट बांधत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे उशिरा का होईना भंडारा-गोंदिया मतदार संघाची निवडणूक रंगतदार ठरत आहे.