महाराष्ट्र

Lok Sabha Election : भाजपचेही स्टार प्रचारक अकोल्यापासून लांब

BJP News फडणवीस, आदित्यनाथ यांची सभा रद्द!

Akola Constituency : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या फेज मध्ये निवडणूक होणार आहे. मात्र, ऐनवेळी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारालाही स्टार प्रचारकांनी दांडी मारलेली दिसते. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना सध्यातरी लोकसभेची खिंड एकट्याला लढवावी लागत आहे. प्रचाराला अवघ्या सात दिवसाचा कालावधी शिल्लक असताना उमेदवारांना स्टार प्रचारकांची प्रतीक्षा कायम आहे

Lok Sabha Election : महाविकास आघाडीचा उमेदवार लढवतोय एकटाच खिंड

 

लोकसभा निवडणुकीत जवळपास सर्वच मतदारसंघात स्टार प्रचारकांमार्फत सभांचा धडाका सुरू आहे. सर्वच पक्षाचे नेते मैदानात उतरले आहेत. मात्र, अकोला लोकसभा मतदारसंघात अद्याप एकाही पक्षाच्या स्टार प्रचारकाची सभा न झाल्याने मतदारसंघाची सर्व जबाबदारी उमेदवारांवर टाकण्यात आली. महाविकास आघाडी सोबतच महायुतीच्या उमेदवारालाही लोकसभेची खिंड एकट्याला लढविण्याची वेळ आली आहे. सध्यातरी ‘अब तुम्हारे हवाले’ असं म्हणण्याची वेळ आली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात याही निवडणुकीत तिहेरी लढतीचं चित्र आहे. काँग्रेसकडून डॉ.अभय पाटील, वंचितकडून अॅड. प्रकाश आंबेडकर तर भाजपकडून विद्यमान खासदार यांचे पूत्र अनुप धोत्रे हे निवडणूक रिंगणात आहेत. लढत काट्याची असताना एकही वरिष्ठ महाविकास आघाडी आणि महायुती मधील मोठ्या नेत्याने अथवा स्टार प्रचारकाने अद्यापही सभा घेतली नाही. अर्ज भरण्याच्या दिवशी देवेंद्र फडणवीस हे महायुतीच्या उमेदवारासाठी आले होते तर नाना पटोले हे महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी मतदारसंघात आले होते. मात्र तेव्हापासून आतापर्यंत एकही स्टार प्रचारक मतदारसंघात आले नाहीत. प्रचार संपण्यास अवघे सात दिवस शिल्लक असताना मोठ्या नेत्याची, स्टार प्रचारकाची एक तरी जंगी सभा व्हावी यासाठी दोन्ही उमदेवारांकडून प्रयत्न सुरू आहेत.

योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांच्या सभा रद्द!

उद्या 20 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारानिमित्त मूर्तिजापूर येथे सभा घेणार होते. त्यासाठी जय्यत तयारी भाजपकडून करण्यात येत होती. मात्र, ऐनवेळी फडणवीस यांची सभा दोनवेळा रद्द झाली. तर 21 एप्रिल रोजी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सभा घेण्यासाठी येणार होते. याही सभेची जय्यत तयारी भाजपने केली होती. मात्र ऐनवेळी ही सभा देखील रद्द झाल्याची माहिती आहे. आता केवळ 22 एप्रिल चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा होणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. मात्र पुढील बाकी असलेल्या दिवसांत एकतरी स्टार प्रचारकाची सभा व्हावी अशी भाजपकडून मागणी होत असल्याची माहिती आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!