महाराष्ट्रात दोन मोठे पक्ष फुटल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप सगळ्यांना पाहायला मिळाला. आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता आणखी एका पक्षात फुट पडण्याची शक्यता आहे. दिवंगत आमदार विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष फुटला आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे बाहेर पडले आहेत. तानाजीराव शिंदे स्वत:ची नवीन संघटना काढणार आहेत. शिवसंग्राम संघटनेतील हजारो कार्यकर्ते आता तानाजीराव शिंदे यांच्या संघटनेसोबत जाण्याच्या तयारीत आहेत.
तानाजीराव शिंदे यांनी शनिवारी रायगडावर जाऊन कार्यकर्त्यांसह शिवरायांचे दर्शन घेतले. दरम्यान रविवारी तानाजीराव शिंदे नवीन संघटनेची घोषणा करणार आहेत. तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराडमधील समाधीस्थळाचे ते दर्शन घेतील. त्यानंतर तानाजीराव शिंदे आपल्या नवीन संघटनेच्या नावाची घोषणा करणार आहेत. दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या एकाधिकारशाहीमुळे संघटनेतील अनेक पदाधिकारी बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती मिळाली आहे.
या आधीही फुटला आहे पक्ष
दिवगंत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षात या वर्षी जानेवारीमध्ये फूट पडली होती. विनायक मेटे यांचे बंधू रामहरी मेटे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जय शिवसंग्राम या त्यांच्या नव्या संघटनेची देखील स्थापना करणार असल्याच्या घोषणा केली होती. विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम पक्षाची जबाबदारी त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याकडे आली होती. मात्र काही दिवसांपासून रामहरी मेटे आणि ज्योती मेटे यांच्यात कौटुंबिक वाद सुरु होते आणि याच वादातून रामहरी मेटे हे पक्षातून बाहेर पडले होते.
बीडसह पाच विधानसभा लढणार – मेटे
शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्ष ज्योती मेटे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यावर ज्योती मेटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी मी मतदारसंघात फिरत आहे. शिवसंग्राम विधानसभा निवडणूक लढविणार आहे. कोणत्या व्यासपीठावर निवडणूक लढविणार हे अद्याप ठरले नाही. शिवसंग्राम हा वेगळा पक्ष आहे. राज्यात कोणत्याही पक्षाची भूमिका स्पष्ट नाही. त्यामुळे आम्हीही त्याच वेळी भूमिका स्पष्ट करू. बीडसह पाच विधानसभा जागांवर आम्ही निवडणूक लढणार आहोत. तशी आमची प्राथमिक चाचपणी झाली आहे. मराठवाडा विदर्भ आणि कोकणमध्ये तयारी पूर्ण झाली आहे. आता आमचे लक्ष पुणे आहे. जरांगे पाटील यांना आमचे शिष्ट मंडळ भेटून आले आहे. त्यांनी राजकीय भूमिका स्पष्ट केली तर आम्ही त्यांच्याकडे दावेदारी करू असं ज्योती मेटे यांनी म्हटलं आहे.