Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. अकोला पश्चिममध्ये थेट हिंदुत्वाचा मुद्द्यावर प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ या मुद्द्यांवर प्रचार केला. आता यासंदर्भात माजी नगराध्यक्ष हरीश अलीमचंदानी यांनी प्रचारादरम्यान भाष्य केलं आहे. आपण सिंधी समाजाचे आहोत. सिंधी हिंदू नाही तर कोण आहेत? असा भावनिक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ब्रिटीश राजवट संपल्यानंतर भारताचे तुकडे झाले. भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाली. त्यावेळी पाकिस्तानातून सिंधी समाजावर अन्याय झाला. पाकिस्तानात प्रचंड दहशत होती. सिंधी हे हिंदूच आहेत, त्यामुळं त्यांची कत्तल करण्यात येत होती. त्यांच्यावर हल्ले होत होते. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत सिंधी समाज भारतात आला. त्यावेळी भारत मातेने सिंधी समाजाला आईची माया दिली. त्यामुळे सिंधी समाजाही सच्चा हिंदूच आहे. कोणी एखाद्या राजकीय पक्षाचा आहे म्हणून केवळ हिंदू होत नाही. असं असेल तर आपण हिंदू नाही का? असा प्रश्नही अलीमचंदानी यांनी उपस्थित केला.
त्यामुळेच पाठिंबा
आपल्याला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहोत, असा अपप्रचार केला जात आहे. आपण अपक्ष उमेदवार आहोत. वंचित बहुजन आघाडीला अकोल्यात जातीय विष नको आहे. अकोल्यात गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणावर दंगली घडल्या. आपण या दंगलींच्या वेळी केवळ मदतीसाठी गेलो. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त संख्या व्यापाऱ्यांची आहे.
या मतदारसंघातील मतदारांना शांतता हवी आहे. त्यांना हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, दलित यांच्या नावानं दंगली नको आहेत. त्यामुळे त्यांना शांतता प्रिय आणि विकासाचं ‘व्हिजन’ असलेल्या आमदाराची गरज आहे. त्यामुळे गुंडगिरी करणाऱ्या, व्यापाऱ्यांकडून वसुलीची हिंमत ठेवणाऱ्यांपेक्षा आपलं नाव वाईट आहे काय, याचा विचार केला जावा असंही अलीमचंदानी म्हणाले.
Sudhir Mungantiwar : निवडणूक असू देत की सण, मुनगंटीवार शेतकऱ्यांसोबत ‘हर दम, हर कदम’ !
आपण स्वत: व्यापारी आहोत. व्यापाऱ्यांच्या वेदना आपण जाणतो. अकोल्याचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी शहरातील सामाजिक सलोखा कायम ठेवला. त्यांनी कार्यकर्त्यांना जपलं. सगळ्याच समाजात लालाजींचा जनसंपर्क होता. जसं अकोल्यातील प्रत्येकासाठी लालाजी आदर्श आहेत, तसेच ते आपल्यासाठीही आहेत. देशाचे राष्ट्रपती म्हणून ए.पी.जे. अब्दूल कलाम यांची निवड झाली होती. त्यावेळी निवड करणाऱ्यांनी कलाम यांची जात, धर्म, पंथ पाहिला नाही.
कलाम यांचे कतृत्व पाहिले. आपणही लालाजी यांचं नाव घेताना त्यांचा पक्ष पाहिला नाही. एक अकोलेकर म्हणून आणि एक व्यापारी म्हणूनही आपल्यासाठी लालाजी पुजनीय होते आणि राहतील. अगदी विरोधी पक्षातील लोकांनीही लालाजी यांचं नाव घेणं हे लालाजी कतृवानं किती महान होते, हे दाखवून देते असंही हरीश अलीमचंदानी यांनी वेगवेगळ्या समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी संवाद साधाताना नमूद केले. आपल्याला अकोल्यासाठी काही तरी चांगलं करायचं आहे. विकास करायचा आहे.
हिंदू विरुद्ध मुस्लिम असं युद्ध आपल्याला घडविण्याची अजिबात इच्छा नाही. आपण नगराध्यक्ष असताना विकासासाठी प्रयत्न केला. तसाच प्रयत्न आताही करण्याची प्रामाणिक इच्छा आहे. निर्णय घेण्याची ताकद आता लोकांच्या हाती आहे. त्यांनाच योग्य व्यक्ती निवडायचा आहे. अकोला शहराला विकासाच्या मार्गावर पुढे न्यायचे की कसे हे जनतेने ठरवावे. जनता जो कौल देईल हो विनम्रपणे स्वीकार असेल असंही हरीश अलीमचंदानी म्हणाले.