Arjuni Morgaon : प्रत्येक पक्षाने आपापला सर्व्हे केला आहे. यामध्ये कोण निवडून येऊ शकतो, कोण नाही, याचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे आला आहे. त्यानुसार जागावाटपाचे आणि उमेदवारीचे नियोजन होत आहे. अशात सत्ता राखण्यासाठी, मतदारसंघ राखण्यासाठी खास रणनितीही आखली जात आहे. साकोलीमध्ये भाजपमधून राष्ट्रवादीत (तत्कालिन एकसंघ राष्ट्रवादी) केवळ उमेदवारीसाठी आलेला जिल्हा परिषद सदस्य आता अजित पवार गटाकडून लढण्याच्या तयारीत आहे. तसेच आता अर्जुनी मोरगावमध्येही होणार आहे.
2014मध्ये अर्जुनी मोरगावमधून भाजपचे राजकुमार बडोले विजयी झाले होते. त्यानंतर त्यांना सामाजिक न्याय खाते देण्यात आले. त्यांची कारकीर्द चांगली राहिली. पण 2019मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोहर चंद्रिकापुरेंकडून त्यांना अवघ्या 718 मतांनी पराभव पत्करावा लागला. दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रवादी फुटल्यानंतर चंद्रिकापुरे अजित पवारांसोबत महायुतीत आले. त्यामुळे त्यांचा दावा कायम आहे.
भाजपने केलेल्या सर्व्हेमध्ये या जागेवर आपला उमेदवार निवडून येणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्याचवेळी चंद्रिकापुरे यांचे निवडून येणे अवघड आहे, असा अहवाल अजित पवार गटाला मिळाला. त्यामुळे अर्जुनीची जागा राखण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मधला मार्ग काढल्याचे कळते. त्याचदृष्टीने माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रिकापुरेंची उमेदवारी धोक्यात असल्याने बडोलेंना उमेदवारी मिळणार, असे दिसत आहे.
2019 नंतर बिघडले गणीत
महाराष्ट्रात 2019मध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजुने लागला. बहुमत नसले तरीही सर्वाधिक 105 आमदार भाजपचे होते. शिवसेनेसोबत सरकार स्थापन होणारच होते. पण मुख्यमंत्रीपदावरून युती तुटली. महाविकास आघाडीचे सरकार आले. राज्यात एक नवे समीकरण तयार झाले. विरोधातील लोक एका बाकावर आले. त्यानंतर अडिच वर्षांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली. दोनाचे चार झाले.
काँग्रेस, भाजपसोबत सहा पक्ष जन्माला आले. आता महायुतीचा जन्म झाला. महायुतीने सरकार स्थापन केले. हे सारे मुंबईत घडत होते. पण खेडोपाडी, तालुक्यांमध्ये, छोट्या शहरांमध्ये त्याचा वाईट परिणाम होईल, याचा विचारच झाला नाही. लोकसभेत फटका बसला. त्यामुळे आता विधानसभेत असे होऊ नये, याकरिता सगळे पक्ष सत्ता राखण्यासाठी अॅडजेस्टमेंटच्या तयारीत आहेत.