महाराष्ट्र

Winter Session : विशेष अधिवेशन फक्त शपथविधीसाठी !

Mahayuti 2.0 : प्रत्यक्ष काम नागपुरात हिवाळी अधिवेशनात सुरू होईल

महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विशेष अधिवशन आजपासून मुंबईत होत आहे. या अधिवेशनात काही विशेष काम होईल, असं वाटत नाही. तर हे अधिवेशन फक्त आमदारांच्या शपथविधीसाठी आहे. प्रत्यक्ष काम नागपुरातील हिवाळी अधिवेशनातच सुरू होईल, असे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

शपथविधीसाठी आज (7 डिसेंबर) मुंबईला रवाना होण्यापूर्वी आमदार जोरगेवार नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे, मी जनतेची सेवा केली त्याचे फलीत म्हणून जनतेने विधानसभेत मला निवडून पाठवलं. आजपासून नवीन इनींगला सुरुवात होत आहे.

देवेंद्र फडणवीस आणि कुटुंब हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. त्यामुळे या जिल्ह्यावर त्यांचे विशेष प्रेम आहे. विदर्भाच्या विकासाचा मार्ग फडणवीस यांच्यामुळे सुकर झाला आहे. महाराष्ट्राती जनतेने मोठ्या बहुमताने सरकारला निवडून दिल आहे. जनतेच्या मोठ्या अपेक्षा आमच्याकडून आहेत. जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे. पण या अधिवेशनात कामकाज होण्याची शक्यता फार कमी आहे. खऱ्या अर्थाने नागपूर हिवाळी अधिवेशनात काम सुरू होणार आहे, असे आमदार जोरगेवार म्हणाले.

आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. लोकसभेत काँग्रेसला यश मिळालं. एकंदरच महायुतीच्या विरोधात तेव्हाचा निकाल होता. त्यानंतर महायुती सरकारने नवीन योजना लागू केल्या. महाविकास आाडीच्या नेत्यांना पसरवलेला फेक नरेटिव्ह लोकांच्या लक्षात आणून दिला. काँग्रेसचे लोक करत काहीच नाही फक्त बोलतात, हे लोकांच्या लक्षात आले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. काँग्रेसचा विकासाचा अजेंडा नसल्यामुळे ते ईव्हीएमवर बोलत सुटले असल्याचे जोरगेवार म्हणाले.

महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा भाजप-शिवसेना युतीचं सरकार आलं, तेव्हा तेव्हा चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळालेलं आहे. या सरकारमध्येही चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळेल, ही खात्री आहे. आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्याचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. आता पूर्वीपेक्षाही अधिक वेगाने विकास कामे होतील, असा विश्वासही आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!