महायुती सरकार सत्तेत अल्यानंतर एड. राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता संपूर्ण बहुमतात महायुती पुन्हा सत्तेत आली. नार्वेकर देखील पुन्हा विधानसभेचे अध्यक्ष झाले. त्यांनी सोमवारी (दि.9) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे खास अभिनंदन केले. नार्वेकरांनी ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले नव्हते, तरीही ते आले, असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी नार्वेकरांचे अभिनंदन केले.
विधानसभा अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. राहुल नार्वेकर यांच्याकडेच जबाबदारी येणार की दुसऱ्या नेत्याला संधी देणार, याबाबत माध्यमांमध्ये देखील चर्चा झाली. भाजपमधील काही नेत्यांची नावे चर्चेत असल्याचे बोलले गेले. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मात्र फक्त राहुल नार्वेकरांचाच अर्ज अध्यक्षपदासाठी आला. दुसरा कुठलाही अर्ज आला नाही, त्यामुळे नार्वेकरांच्या नावाची फक्त अधिकृत घोषणाच शिल्लक होती. त्यानुसार सोमवारी (दि.9) त्यांच्या नावाची घोषणा झाली आणि त्यांनी सूत्रेही स्वीकारली. सत्तापक्षाने नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकर यांचे अभिनंदन करताना ‘मी पुन्हा येईन’ या वाक्याची आठवण करून दिली. ते म्हणाले, ‘राहुल नार्वेकरजी ‘मी पुन्हा येईन’ असे तुम्ही म्हटले नव्हते. पण तुम्ही परत आलात याचा मनापासून आनंद आहे. आता या खुर्चीत बसून तुम्ही पुन्हा एकदा सदस्यांना न्याय देण्याचे काम करणार आहात, यात मला मुळीच शंका वाटत नाही.’ आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये विधानसभा अध्यक्ष आणि दुसऱ्या टर्ममध्येही अध्यक्ष होणारे नार्वेकर पहिले सदस्य असतील, याचाही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला.
Devendra Fadnavis : अध्यक्ष तर ठरले, किमान उपाध्यक्ष तरी द्या!
नार्वेकर यांच्या रुपाने पुन्हा एकदा एका अभ्यासू व्यक्तीची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात राजकीय संक्रमणाचा काळ सर्वांनी अनुभवला. याच कालावधीत विधानसभा अध्यक्षपद सर्वाधिक चर्चेत राहिले. त्यानिमित्ताने राहुल नार्वेकर यांच्याकडे असलेल्या जबाबदारीचीही मोठी चर्चा झाली. त्या काळात नार्वेकर यांच्या संपूर्ण ज्ञानाचा कस लागला, असेही फडणवीस म्हणाले.
पुन्हा अध्यक्ष होण्याचा मान!
राहुल नार्वेकर आपण अतिशय तरुणवयात अध्यक्ष झालात. आपल्याला कायद्याचं ज्ञान आहे. त्यामुळे सभागृहात उद्भवलेल्या पेच प्रसंगांमध्ये कुणावरही अन्याय होऊ न देता त्यांनी यापूर्वी काम केले आहे. नार्वेकरांनी सभागृहातील दालनांचेही रुपडे पालटले. त्यांनी आपल्या कारकिर्दीतून अडिच वर्षांत वेगळी प्रतिमा तयार केली, असंही फडणवीस म्हणाले.