महाराष्ट्र

Assembly Elections : सोनाळा ग्रामस्थांचा विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार!

Sonalagao : स्वातंत्र्य काळापासून मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

Assembly Election 2024  : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. राज्याच्या आणि राजकीय नेत्यांच्या भवितव्याचा फैसला होईल. या निवडणुकीत नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने थेट मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. अकोल्यातही एका गावातील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा इशारा दिला आहे. तसं निवेदन त्यांनी प्रशासनाला सादर केलं. सोनाळा असं या गावचे नाव आहे. हे गाव बाळापूर विधानसभा मतदारसंघात आहे. बहिष्कार टाकण्यासंदर्भात अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

मोर्णा नदीच्या पुलाची उंची

बाळापूर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या सोनाळा गावाजवळून वाहत असलेल्या मोर्णा नदीच्या पुलाची उंची अत्यंत कमी आहे. यामुळे अनेक गावांमधील प्रवाशांना पावसाळ्यातील चार महिन्यात जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करावा लागतो. तसेच सोनाळा गावातील विद्यार्थी वर्ग पाचवीच्या पुढे शिक्षण घेण्यासाठी अंदूरा या गावात पायदळ व सायकलने येणे जाणे करतात. त्यामुळे पावसाळ्या थोडा पाऊस आला तरी नदीचे पाणी या पुलावरून वाहते. शालेय विद्यार्थ्यांना अनेक वेळा अंदुरा येथेच रात्रभर थांबावे लागते, अशी स्थिती गावकऱ्यांनी सांगितली आहे. आई-वडिलांना जीव धोक्यात घालून आपल्या मुलांना पुराच्या पाण्यातून गावात आणावे लागते. पावसाळ्यात शेतमालही शेतकऱ्यांना शेतातच ठेवावा लागतो.

या पूलाची उंची वाढवावी यासाठी गावकऱ्यांनी अनेकवेळा शासनदरबारी निवेदने दिली. कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याने किंवा राजकीय नेत्याने या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा गाव खेड्यातील नागरिकांना चांगले रस्ते मिळत नाहीत, हे मोठे दुर्दैव असल्याचं निवेदनात म्हटलं आहे.

गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती ही नदीच्या पलीकडे आहे. तसेच गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांना पावसाळ्याच्या दिवसात मोठा त्रास सहन करावा लागतो. त्या पुलाची उंची वाढविण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी स्वातंत्र्य काळापासून विविध पक्षातील अनेक पदाधिकारी अधिकारी यांना अनेकदा निवेदने दिली आहेत. परंतु एकानेही याची दाखल घेतली नाही. परिणामी ग्रामस्थांनीनोव्हेंबर मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

त्या संदर्भात जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष विष्णू अरबट, पंकज कुकडे, सारंगधर पाटील, नरेंद्र अरबट, रघुनाथ अरबट, अरुण उगले, दिनकर उगले, राहुल उगले, ज्ञानदेव उगले, विठ्ठल अमझरे, अशोक अमझरे श्रीकृष्ण अमझरे पंकज बाजोड, कुशल जैन, रवी गावडे, श्रीकृष्ण वैराळे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

Assembly Election : तर उमेदवाराला दणकट खर्च करावा लागेल!

शेवटचा पर्याय

दरम्यान मोर्णा नदीच्या कमी उंचीच्या पुलामुळे परिसरातील अंदुरा, सोनाळा, बोरगाव, धामणा, नैराट, वैराट, गोपाल खेड, गांधी ग्राम, हातरूण, खांबोरा, लोणाग्रा, आगर आदी गावांना येणारी व जाणारी वाहतुक पावसाळय़ात नेहमीच बंद असते. परिणामी येथील ग्रामस्थांना अव्वाच्या सव्वा भाडे देऊन प्रवास करावा लागतो. त्यासाठी विनंती अर्ज झाले. आता मतदानावर बहिष्कार हा शेवटचा प्रयत्न गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!