Assembly Election : भंडारा, गोंदिया जिल्ह्यात अनेक शिक्षण महर्षी तयार झाले आहेत. मात्र आपण कधीही शिक्षणाचं बाजारीकरण होऊ दिलं नाही. प्रशासकीय दृष्टीनं भंडारा आणि गोंदिया जिल्हा वेगळे झाले आहेत. मात्र आपल्या मनात आजही भंडारा आणि गोंदिय हे एकच आहेत. आपल्याला भंडारा जिल्ह्यानेच सर्वांत प्रथम खासदारकी दिली. त्यामुळं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांचे ऋण आपण फेडू शकत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तथा कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले. लाखांदूर मध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.
आपण ‘भेल’ उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु काही लोकांनी हा कारखाना येऊ दिला नाही. ‘भेल’चा कारखाना आला तर त्याचं श्रेय प्रफुल पटेल यांना जाईल, अशी भीती त्यांना वाटत होती. त्यामुळं प्रफुल पटेलच्या भीतीपोटी एका आमदारानं ‘भेल’पासून भंडारा, गोंदिया जिल्ह्याला वंचित ठेवण्याचं पाप केलं असं खासदार प्रफुल पटेल म्हणाले. जाहीर सभेतून त्यांनी विकासाच्या मार्गात अडसर निर्माण करणाऱ्यांना थेट आव्हान दिलं. केवळ आपल्या स्वार्थापोटी ‘भेल’ सारखा उद्योग अडविला, असंही पटेल म्हणाले.
असे कसे विकास पुरूष?
विकासाला अडथळा निर्माण करणाऱ्यांना विकास पुरूष अशी उपमा दिली जाते. हे कसले विकास पुरूष असा सवालही खासदार पटेल यांनी उपस्थित केला. धापेवाडा परिसरात सिंचन जाणण्यासाठी व्यापक प्रयत्न केल्याचंही पटेल यांनी सांगितलं. आगामी काळात विकास कामं वेगानं होणार आहे. तुमसरमध्ये आणि तिरोडातही पाण्याची उपलब्धता होत आहे. गोसीखुर्द प्रकल्प रखडला होता. केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर गोसीखुर्दचा प्रकल्प मार्गी लागला, असंही पटेल यांनी नमूद केले.
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात विकासाची कामे आम्ही केली. मात्र यासंदर्भात विरोधकांनी कामांची यादी जाहीर करावी. आपण खोटं बोलत असू तर विरोधकांनी विकास कामांची यादी लोकांपुढं ठेवावी. प्रफुल पटेल नावाच्या व्यक्तीनं विकास कामं केली आहे. त्यामुळे आपण मतदारांपुढं बोलण्याची हिंमत ठेवतो. तो कामं करतो तोच बोलतो असंही पटेल म्हणाले. अदानीचा ऊर्जा प्रकल्प होत आहे. आणखीही उद्योग भंडाऱ्यात येत आहेत. त्यामुळं भंडारा आणि गोंदियातील तरुणाईच्या हाताला काम मिळणार आहे. विकासाच्या मुद्द्यावर आपण अत्यंत आग्रही असल्याचंही पटेल म्हणाले.
खासदारकी पक्की
प्रफुल पटेल हे खासदार आहेत. आपली खासदारकी आणखी पक्की आहे. आपल्या खासदारकीला धक्का लागेल असे चित्र नाही. पण आपल्या जिल्ह्यातील विकास थांबल्याचं दु:ख वाटतं. आपण स्वत: विकासाच्या मुद्द्यावर आग्रही आहोत. पण त्यानंतरही मतदार चुकीच्या लोकांना निवडून देत असल्याबद्दल प्रफुल पटेल यांनी संताप व्यक्त केला. आपण विजयी होत नाही हे काही लोकांना ठाऊक आहे. पण काही लोक निवडणूक यासाठी लढत आहेत कारण त्यांना दुसऱ्यांना निवडून येऊ द्यायचे नाही. त्यामुळे असे लोक जास्त घातक असल्याचंही प्रफुल पटेल म्हणाले.