Akola Politics : विधानसभेची निवडणूक आटोपल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा हालचाली तीव्र झाल्या आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कंटाळलेले काही नेते पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आले आहेत. यामध्ये अकोल्यातील शिवसेनेच्या नेत्यांचाही समावेश आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील काही नेते व पदाधिकारी सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहे. अद्याप या नेते व पदाधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र लवकरच राज्यभरामध्ये महाविकास आघाडीत पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे. त्यात अकोला जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडेल, असा धोका दिसत आहे.
बंड
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार व तत्कालीन मंत्री बाहेर पडले होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह मिळवले आहे. तेव्हापासून ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदे यांची शिवसेना असे युद्ध सुरू आहे. भाजपने हे विभाजन घडवून आणल्यानंतर शिवसेनेला सर्वाधिक राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेनेच्या नेत्यांकडून सर्वाधिक टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर झाली. निवडणुकीच्या निकालात मात्र फासे फिरले. महायुतीला बहुमत मिळालं. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सूर बदलले आहेत.
राजकीय अस्तित्वाचा प्रश्न
शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेक नेत्यांना आता आपल्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न भेडसावत आहे. भारतीय जनता पार्टीसोबत फारकत घेतल्यानंतर शिवसेनेने काँग्रेससोबत हात मिळवणी केली. त्यामुळे अद्यापही काही शिवसैनिक दुखावले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांचा वापर केला जात आहे. अकोला जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक काँग्रेसने लढवली. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना संपूर्ण ताकदीने सहकार्य केले. सहाजिकच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळावी अशी अपेक्षा शिवसेनेची होती. मात्र काँग्रेसने या जागेच्या मुद्द्यावर प्रतिष्ठा पणाला लावली
नाना पटोले
काँग्रेसच्या हाय कमांडनेनी देखील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना साथ दिली. याशिवाय अकोला जिल्ह्यामध्ये काँग्रेसकडून पाहिजे तसे सहकार्य शिवसेनेला मिळाले नाही. शिवसेनेच्या सर्वच उमेदवारांनी आपल्या जोरावर निवडणूक लढवली आहे. या निवडणुकीनंतर शिवसेनेचे काही नेते व पदाधिकारी नाराज झाले आहेत. आपण आघाडीचा धर्म पाळायचा पण काँग्रेस हा नियम पाळणार नाही, अशी टीका आता त्यांच्याकडून होऊ लागली आहे. मात्र या भावना ऐकून घेण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तयार नसल्याची दिसत आहेत. त्यामुळे यातील काही नेत्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बोलावणं मिळालं आहे. योग्य सन्मान, संधी मिळाली तर अकोला शिवसेनेतील काही पदाधिकारी या शिवसेनेतून त्या शिवसेनेत दिसण्याची दाट शक्यता आहे.