Political War : योग्य पद्धतीने काम करणार्या प्रशासकीय यंत्रणेवर, निवडणूक यंत्रणेवर संशय घेणे, हे उध्दव ठाकरे यांचे नेहमीचेच रडगाणे आहे. एव्हाना त्यांच्या या सवयीची सर्वांनाच कल्पना आलेली आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यावर आता त्यांनी काहीही आरोप केले तरी त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले.
मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला चढवला. ते म्हणाले. आरोप करताना एकीकडे उध्दव ठाकरे त्याच निवडणूक प्रक्रियेतून सामोरे जात आहेत. दुसरीकडे छातीठोकपणे आमचे एवढे खासदार निवडून येणार, असेही सांगत आहेत. मग आपला या यंत्रणेवर विश्वासच नाही, तर कशाच्या आधारावर हा आत्मविश्वास आला?
प्रशासकीय आणि निवडणूक यंत्रणा एकतर्फी काम करतेय तर मग तुम्हाला निवडून येण्याची खात्री कुठून आली आहे. असा सवाल त्यांनी केला. महाविकास आघाडीच्या ३० – ३५ जागा येतील. हे कशाच्या आधारावर बोलत आहात, असाही प्रश्न उमेश पाटील यांनी उध्दव ठाकरे यांना केला आहे.
Ajit Pawar : पहाटेच्या शपथविधीबाबत उमेश पाटलांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले
उध्दव ठाकरे यांचे हे दुटप्पी बोलणे आहे. सर्वच शहरांत मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. ऊन्हाचा वाढलेला पारा आणि मतदारांचा निरुत्साह यामुळे मतदान कमी झाले. आता हे कमी का झाले, यावर राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. याची नोंद घेतली पाहिजे, असेही उमेश पाटील म्हणाले.
सहानुभूतीवर राजकारण जिंकता येत नाही
उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहानुभूती आहे का, असे विचारले असता, सहानुभूतीने राजकारण होते, हे समजणे मुळातच चुकीचे आहे. येथे प्रॅक्टीकल राहावे लागते. सहानुभूतीच्या लाटेवर निवडणुका जिंकण्याचे दिवस आता राहिलेले नाही. आता लोकांना काम दाखवावे लागते आणि आमचे सरकार ते चांगल्या पद्धतीने करत आहे. त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात त्यांनी व्यवस्थित काम केले असते, तर त्यांच्यावर आज ही वेळ आली नसती, असेही उमेश पाटील म्हणाले.