Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यात शांतता रॅली सुरु केली आहे. या रॅलीने काल नांदेडमध्ये प्रवेश केला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा लक्ष्य साधले आहे. सगेसोयरे विषयावरून चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावरूनही जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. पुढे जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाना साधला. फडणवीस साहेब, तुम्हाला वाटत असेल, तुम्ही लय हुशार आहात, पण लक्षात ठेवा.. असा गर्भीत इशारा जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणातून दिला.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नांदेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सभेला सुरूवात केली. मनोज जरांगे यांचं भाषण सुरू होण्यापूर्वी ‘पाटील- पाटील’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. ढगाळ वातावरण, रिमझिम पावसात मनोज जरांगे पाटील यांनी सभेला संबोधित केले. आपल्या विरोधात जे जातील त्यांना पाडा. मग ते महाविकास आघाडीचे असो की महायुतीचे असो. पाडायचे म्हणजे पाडायचे, असे आवाहन मनोज जरांगेंनी नांदेडच्या सभेत केले.
मराठे कोणाचेही उपकार ठेवत नाही
मराठ्यांची लोकसंख्या 50 ते 55 टक्के आहे. मराठे कोणाचेही उपकार ठेवत नाहीत. तुम्ही आम्हाला आरक्षण दिले तर मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील.
दगाफटका केला तर 288 पण पाडायला कमी करणार नाहीत असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ‘तुमच्या त्या चंद्रकांत दादा पाटलांना आधी अध्यादेश वाचायला सांगा. ते म्हणतात, अध्यादेशाची 2017 ला अंमलबजावणी त्यांनी केलेली आहे. तुम्ही त्याला आमच्यावर सोडताय, तुम्ही आमच्या अंगावर कोणा कोणाला सोडताय? छगन भुजबळ, गिरीश महाजन साहेब… कोणाला पाठवताय हे आम्हाला कळत नाही, असेही जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले. नातेवाईकाची 2017 ला अंमलबजावणी झालेली आहे. नातेवाईकांचा अध्यादेश वेगळा आणि सगेसोयऱ्यांचा वेगळा आहे. त्यांना काही माहिती नसते असे सांगत जरांगे पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांची हुबेहुब नक्कलही केली.