महाराष्ट्र

Assembly Elections : वंचितच्या पहिल्या यादीत सिंदखेडराजाला स्थान !

Vanchit Bahujan Aghadi : वंजारी समाजाच्या सविता मुंढेंना उमेदवारी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी प्रस्थापित राजकीय पक्षांत अद्याप चर्चेचे गुर्‍हाळच सुरू आहे. असे असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपली पहिली यादी जाहीर करून, राजकीय पक्षांना जोरदार चपराक दिली आहे. मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ११ उमेदवारांची घोषणा केली. पहिल्याच यादीत बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघातून त्यांनी वंजारी समाजाच्या नेत्या सविता मुंढे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, रावेरमधून लेवा पाटील समाजाच्या तृतीयपंथींच्या नेत्या शमिभा पाटील यांच्यासह ओबीसीसह सर्व समाजाला प्रतिनिधीत्व देण्याची भूमिका घेतलेली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली आहे. ‘वंचित’ने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात पक्षाने रावेर विधानसभा मतदारसंघात शमिभा पाटील यांना उमेदवारी दिली. शमिभा या ट्रान्सजेंडर (तृतीय पंथीय) आहेत. त्या लेव्हा पाटील समाजाचे प्रतिनिधित्व करतात. तसेच, या यादीद्वारे जातीय समीकरणही साधण्याचा प्रयत्न झाला आहे. पक्षाने या यादीच्या माध्यमातून लेव्हा पाटील, वंजारी, बुद्धिस्ट, लोहार (ओबीसी) धीवर, मुस्लीम, लिंगायत, मराठा, पारधी (आदिवासी) व वडार समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. यातील नीलेश विश्वकर्मा हे वंचित आघाडीच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघासह छत्रपती संभाजीनगर पूर्व येथून भाजपचे अतुल सावे, रावेरमधून काँग्रेसचे शिरीष चौधरी, नांदेड दक्षिण येथून काँग्रेसचे मोहन हंबर्डे, सिंदखेडराजा येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे आमदार असलेल्या जागांवर आंबेडकरांनी उमेदवार उभे केले आहेत.

बच्चू कडूंबरोबर जमू शकत नाही

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीतही मोठ्या संख्येने उमेदवार उभे केले होते. परंतु त्यांच्या एकाही उमेदवाराला निवडणुकीत यश मिळाले नव्हते. त्यात अनेकांचे डिपॉझीट जप्त झाले. दुसरीकडे, माजी खासदार राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती, आमदार बच्चू कडू या तीन प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन परिवर्तन महाशक्ती ही नवी आघाडी स्थापन केली आहे. पुण्यात संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडू यांची नुकतीच बैठकदेखील पार पडली होती. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनाही तिसर्‍या आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे राजू शेट्टी म्हणाले होते. त्यावर आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राजू शेट्टीसोबत जी चर्चा झाली. ती तुमच्यासमोर मांडतो. वामनराव चटप राजुरामधून लढतात आणि गोंडवाना पार्टी देखील तेथून लढते. वामनराव चटप दुसर्‍या जागेवरुन लढणार असतील तर आम्ही विचार करु शकतो. आपण प्रादेशिक पार्टीसंदर्भात बोललो तर ठिक आहे. लिस्ट आमच्याकडे आलेली आहे. बच्चू कडूंबरोबर आमचे जमू शकत नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले.

विधानसभा निवडणूक उमेदवार यादी

रावेर : शमिभा पाटील (तृतीयपंथी)

सिंदखेडराजा : सविता मुंढे

वाशिम : मेघा किरण डोंगरे

धामणगाव रेल्वे : नीलेश विश्वकर्मा

नागपूर दक्षिण पश्चिम : विनय भांगे

साकोली : डॉ. अविनाश नन्हे

नांदेड दक्षिण : फारुक अहमद

लोहा : शिवा नारंगळे

औरंगाबाद पूर्व : विकास दांडगे

शेवगाव : प्रा. किसन चव्हाण

खानापूर : संग्राम माने

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!