Manoj Jarange Patil : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा पुन्हा सामना करावा लागला आहे. भोकर विधानसभा मतदारसंघातील गणपूर येथे हा प्रकार घडला. मराठा आंदोलकांनी त्यांचा मार्ग अडविल्याचे सांगण्यात येत आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी व्हावी, ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्यावे ही मनोज जरांगेंची मागणी आहे. त्यांच्या या मागणीला ओबीसी (OBC) समाजाचा विरोध आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे. ओबीसीतून देवू नये, अशी त्यांची ही मागणी आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी अनेकवेळा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मात्र त्यांना पूर्णपणे यश आलेले नाही. त्यामुळे मराठा समाजबांधव सरकारमधील पुढाऱ्यांवर रोष व्यक्त करताना दिसून येत आहेत. मराठा आरक्षणासाठी आपण गप्प का? मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे प्रश्न करीत मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांनी माजी आमदार अमिता चव्हाण यांचा मार्ग रोखला.
श्रीजया रिंगणात
भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण या भोकर विधानसभा मतदारसंघातील गणपूर येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. भोकर विधानसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी चव्हाण कुटुंबीयांची गावोगावी भेटीगाठी सुरू आहेत. माजी आमदार अमिता चव्हाण या अर्धापूर तालुक्यातील गणपूर येथे गावभेटीसाठी गेल्या होत्या. परत येताना त्यांना मराठा आंदोलकांनी अडविले. आता तुम्ही भाजपात आहात. मराठा आरक्षणासाठी तुमची भूमिका काय? असा जाब मराठा अंदोलकांनी विचारला. यापूर्वी श्रीजया चव्हाण यांनादेखील मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता.
लोकसभा निवडणुकीतही मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहेते. तेव्हा अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये हा मुद्दा गाजला होता. या निवडणुकीत काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी बाजी मारली होती. 2014 मध्ये प्रताप चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. मात्र या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण सोबत होते, तरीही चिखलीकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
मराठा आरक्षण आंदोलनाची धग कायम आहे. याचा फटका भाजपचे स्टार प्रचारक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही बसला होता. अमिता चव्हाण यांना एप्रिल २०२४ मध्येही अडविण्यात आले होते. खासदार अशोक चव्हाण महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी कोंढा येथे गेले होते. त्यावेळी मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाण गो बॅक, अशा घोषणा देत त्यांचा ताफा अडविला होता. हा रोष पाहून त्यांना माघारी फिरावे लागले. वाहन परतल्यानंतर त्यावर काहींनी दगडफेक करण्याचा प्रयत्नही केला होता.