Siddharth Kharat : राज्यातील प्रशासकीय अधिकारी राजकारणात उतरण्याची अनेक उदाहरणे आहेत. मंत्रालयातील आणखी एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने आता राजकारणाची वाट धरली आहे. मंत्रालयात 3 दशकांहून अधिक काळ सेवा बजावत सहसचिव (गृह) या पदावर पोहोचलेले सिद्धार्थ खरात यांनी अलिकडेच स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. मंगळवारी (ता. 3) त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षात प्रवेश घेतला.
आगामी विधानसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून ठाकरे गटातर्फे ते निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. मातोश्री येथे मंगळवारी झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी खरात यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी खासदार अरविंद सावंत, माजी खासदार विनायक राऊत, बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना नेते प्रा. नरेंद्र खेडेकर, आशिष रहाटे व जिल्ह्यातील शिवसैनिक होते.
Chandrapur Constituency : आता डॉक्टरांनाही पडली राजकीय ग्लॅमरची भुरळ !
सिद्धार्थ खरात यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रामविकास विभाग, गृह विभागामध्ये सहसचिव म्हणून काम केले आहे. अनेक राज्यमंत्री, कॅबीनेट मंत्री व केंद्रीय राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव म्हणून सेवा बजावली आहे. खरात हे बुलढाणा जिल्ह्यातील मातृतिर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील रहिवाशी आहेत. त्यांनी आपली नोकरी सांभाळून गेली 20 वर्ष बुलढाणा जिल्ह्यात विविध विकास कामे व प्रकल्प आणून ते पूर्णत्वास नेण्यात महत्वाचे योगदान दिले आहे.
मेहेकर हा मतदारसंघ मागील 30 वर्षापासून एकहाती प्रतापराव जाधव यांच्याकडे राहीला आहे. तेथे विकास कामे ठप्प झाली आहेत. प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले सिद्धार्थ खरात यांच्या पक्ष प्रवेशाने मेहेकर -लोणार मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा नागरिकांना आहे. त्यांच्या प्रवेशाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलतील, अशी चर्चा होऊ लागली आहे.