महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : मातृतीर्थाच्या जिल्ह्यात लोकसभेच्या दोन महिला समोरासमोर

Buldhana Constituency : महायुतीकडून श्वेता महाले, महाविकास आघाडीकडून जयश्री शेळके यांना संधीची शक्यता

Political News : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने राजकीय वातावरण तापले आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यात अजून उमेदवार जाहीर झाले नसल्याने उत्सुकता लागून आहे. सध्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात महायुतीकडून आमदार श्वेता महाले आणि महाविकास आघाडीकडून जयश्री शेळके या दोन महिला रणांगणात उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात गेल्या 15 वर्षांपासून शिवसेनेचे प्रतापराव जाधव खासदार आहेत. मात्र यावेळी त्यांच्या विरोधात नाराजीची लाट असल्याचे भाजपने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यामुळे या मतदारसंघावर आता भाजप दावा करीत आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांच्या पत्नी चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये (Mahaviks Aghadi) ही जागा उद्धव ठाकरे गटाला सोडण्यात आली आहे. त्यासाठी नरेंद्र खेडेकर यांच्या नावाची चर्चा होत आहे. परंतु नरेंद्र खेडेकर हे कमकुवत उमेदवार असल्याने उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवाराची चाचपणी केली जात आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील ही बातमी वाचली का?

Ravikant Tupkar : राजू शेट्टी यांच्याबद्दल काय बोलून गेले रविकांत तुपकर

काँग्रेसच्या प्रदेश सचिव अॅड. जयश्री शेळके या प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात या दोन्ही महिला लोकसभेच्या रणांगणात एकमेकांविरोधात उभ्या ठाकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना जयश्री शेळके यांनी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांसह ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांची भेट घेत चर्चा केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीकडून जयश्री शेळके यांना उमेदवारी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे झाल्यास बुलढाणा मतदारसंघात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे.

ग्रामीण मतदारांवर मदार

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 2019 मधील नोंदणीनुसार 18 लाख 22 हजार 952 मतदार आहेत. त्यातील 4 लाख मतदार दलित-आदिवासी समाजातील आहेत. 2 लाख 11 हजार मतदार मुस्लीम आहेत. ग्रामीण भागातून सर्वाधिक मतदार आहेत. 14 लाख 69 हजार 299 मतदान खेड्यापाड्यांतून होते. शहरी भागातील मतदान 3 लाख 53 हजार 653 झाले होते. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला निवडणूक जिंकायची असेल तर ग्रामीण मतदान मिळविणे गरजेचे आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत सरासरी 63.50 टक्के मतदान झाले होते. त्यात प्रतापराव जाधव यांनी 5 लाख 51 हजार 977 मतदान घेत प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला होता. डॉ. शिंगणे यांना 1 लाख 33 हजार 287 मतांनी पराभवाचे तोंड बघावे लागले होते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीची मते निर्णायक ठरली होती.

error: Content is protected !!