महाराष्ट्र

Baba Siddique : शुबू लोणकर हा अकोल्याचा शुभम लोणकर?

Bishnoi Gang : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं अकोला कनेक्शन उघड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते माजी आमदार बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान या हत्येची जबाबदारी घेणारी एक फेसबुक पोस्ट समोर आली होती. या फेसबुक पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे. दरम्यान, शुबू लोणकर हा लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा असल्याचे म्हटल्या जात आहे. मात्र शुबू हा मूळचा अकोला जिल्ह्यातील शुभम रामेश्वर लोणकर आहे का? याचा तपास सुरू झाला आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं अकोला कनेक्शन समोर आलं आहे.

दसऱ्याच्या दिवशी माजी मंत्री राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुंबईतील वांद्रे भागात बाबा सिद्दिकी यांच्यावर पिस्तूलने गोळ्या झाडण्यात आल्या. बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर दसऱ्याच्या निमित्त आतषबाजी सुरू होती. त्याचवेळी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. दरम्यान ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली का? एसआरए प्रकल्पवरून असलेल्या वादातून झाली आहे का? की बिश्नोई गँगचा या प्रकरणात काही हात आहे? या तीन दिशांनी पोलीस तपास करत असल्याची माहिती आहे.

शूबू हाच शुभम?

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर फेसबुकवरील एक पोस्ट व्हायरल झाली आहे. पोलिसांनी आता त्याही दिशेने तपास सुरू केला आहे. एका तरुणाने फेसबुक पोस्ट करत या हल्ल्याची जबाबदारी घेतली. शुबू लोणकर महाराष्ट्र या फेसबुक अकाऊंटवर आलेली पोस्ट मूळचा अकोला येथील शुभम लोणकर याने केली असू शकते. तो अकोट तालुक्यातील नेव्हरी बुद्रुक येथील रहिवासी आहे. त्या अँगलने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शुभम लोणकर याच्या गावी पोलीस पोहोचले असता घराला कुलूप असलेले आढळून आले होते. त्या ठिकाणी कोणीही नव्हते.

शुबू लोणकर याचे खरे नाव शुभम लोणकर असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. शुभम लोणकर हा मूळ अकोल्यातील अकोट तालुक्यातील रहिवाशी आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो पुणे येथे राहत असल्याची माहिती आहे. शुभम लोणकर याला फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी अकोल्यातून अवैध शस्त्रांसह अटक केली होती. तपासात शुभम लोणकर याचं कनेक्शन लॉरेन्स बिश्नोई गँगसह असल्याचं समोर आलं होतं.

या चौकशीत त्याने सांगितल्यानुसार, परदेशात असलेली लॉरेन्स बिश्नोई याच्या जवळची व्यक्ती अनमोल बिश्नोईसोबत तो संपर्कात होता. दोघे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलत होते. त्यावेळी शुभम लोणकर याने तो व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून लॉरेन्स गँगशी संपर्कात असल्याचं मान्य केलं होतं. आता फेसबुक पोस्ट करणारा शुबू उर्फ शुभम लोणकर हाच आहे का याचा पोलीस तपास करीत आहेत.

Sudhir Mungantiwar : महाविकास आघाडी म्हणजे ‘नापास विद्यार्थी’!

कोण आहे शुभम रामेश्वर लोणकर?

शुभम रामेश्वर लोणकर याच्यावर अकोला पोलिसांनी फेब्रुवारी 2023 मध्ये कारवाई केली होती. तीन पिस्तुल आणि 11 जिवंत काडतूस त्याच्याकडून जप्त केल्या होत्या. शुभम लोणकर हा लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संपर्कात असल्याचं तपासात समोर आलं होतं. 4 फेब्रुवारी 2024 रोजी अकोला पोलिसांनी शुभमला पुण्यातील वारजे भागातल्या भालेकर वस्तीतून अटक केली होती. बेकायदा शस्त्रविक्रीप्रकरणी अकोला पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती, त्यानंतर तो पुणे येथे राहत होता, अशी माहिती मिळत आहे.

शुभमच्या भावाला अटक!

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन आरोपींना ताब्यात घेतलं होतं. तर, एक आरोपी फरार आहे. यानंतर शुभम लोणकर याच्या फेसबुक पोस्टवरुन बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी घेण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करत शुभम लोणकर याचा भाऊ प्रवीण लोणकर या.ला अटक केली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!