महाराष्ट्र

Lok Sabha Election : जेवणासाठी मतदान थांबवणा-या पथकाला ‘शो कॉज’

Violation of Rules : सोशल मीडियात नवीन वादाला सुरुवात

Yavatmal Washim Constituency : यवतमाळ लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया थांबवून केंद्रावरील अधिकारी मतदान कक्षात जेवायला बसल्याने मतदारांना 25 मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथे शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला होता. याची निवडणूक विभागाने गंभीर दखल घेतली आहे. मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी यांना आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी हिवरी मतदान केंद्र प्रमुखांकडे खुलासा मागितला आहे.

मतदान प्रक्रियेत खंड पडू नये असा नियम आहे; परंतु या ठिकाणी कर्मचाऱ्यांची दुपारी दीडच्या सुमारास अवकाश घेऊन सर्वानी मिळून एकत्र जेवण केले. यामुळे सुमारे 25 मिनिटे मतदान थांबले होते.

या प्रकाराची सोशल मीडियावर चर्चा झाली. तसेच वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काहींच्या मते हा गंभीर प्रकार आहे. मतदान थांबविणे आणि मतदारांना ताटकळत ठेवणे ही बाब अक्षम्य आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी असे काही जणांना वाटते.

परंतु काही जणांनी कर्मचाऱ्यांची बाजू घेतली आहे . मतदानासाठी जाणारे कर्मचारी हे मतदानाच्या आदल्या दिवशी सकाळी 7 वाजता विहित जागेवर पोहचतात. त्यांना पुन्हा एकदा उजळणी म्हणून प्रशिक्षण देण्यात येते. यानंतर दिवसभरात केव्हा तरी पोलिंग पार्टी मतदान केंद्रावर रवाना होतात. केंद्रावर ते त्याच दिवशी म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी मतदानासाठी लागणारी सर्व व्यवस्था करतात. मतदान केंद्र हे सहसा एखाद्या शाळेवर असते. कधी तिथे त्यांना दैनंदिन गरजेची साधने नसतात. जेवणापासून नित्य कामे ही त्यांना तिथेच करावी लागतात.

याशिवाय मतदान प्रक्रियेत एखादी चूक झाल्यास त्याचे परिणाम अतिशय गंभीर होत असल्याने ते सतत दबावाखाली असतात. आणि काहींना मधुमेह, रक्तदाब यासारख्या व्याधी पण असतात. अगदी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरु होत असल्याने नास्ता आणि जेवण करण्यासाठी वेळेची वानवा असतेच. शेवटी कर्मचारी ही माणसेच आहेत.त्यांना सुद्धा दैनंदिन गरजा आहेतच.म्हणूनच निवडणूक आयोगाने कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी व जेवणासाठी विहित वेळ नेमून दिल्यास असा प्रकार होणार नाही असे देखील बोलले जात आहे. परंतु हे प्रकरण कसे वळण घेते याकडे लक्ष लागले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!