बुलढाणा जिल्ह्यातील शिंदे गटाकडे असलेल्या विधानसभेच्या सर्व जागा काढून घेण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. त्यासाठी विधानसभानिहाय मायक्रो प्लानिंग करण्यात आले आहे. त्यादृष्टीने कडवट शिवसैनिकांकडे विधानसभानिहाय जबाबदार्या सोपविण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक विजया खडसान पाटील यांच्याकडे चिखली, सिंदखेडराजा, मेहकर विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हा महिला संघटिका विजया खडसन पाटील यांच्याकडे चिखली, सिंदखेडराजा, मेहकर या तीन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर जिल्हा संघटक गोपाल बछिरे यांच्याकडे बुलढाणा जिल्हा व विधानसभा संघटक विजय (बंडू) बोदडे यांच्याकडे खामगाव मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. विधानसभा समन्वयक भिपुलाल जैन यांच्याकडे खामगाव विधानसभा, तालुका प्रमुख हर्षल आखरे यांच्याकडे शेगाव तालुका, श्रीराम खेलदार यांच्याकडे खामगाव तालुका तर संदीप वर्मा यांच्याकडे खामगाव शहरप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी अनेकांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. सद्या तरी निष्ठावंतांना प्राधान्य देण्याचे धोरण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठेवले आहे. विधानसभा मतदारसंघात पक्ष बांधणी व मतदारांपर्यंत पोहोचणे यावरच सध्या जोर दिला जात आहे. उमेदवारीबाबत मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतःच निर्णय घेणार आहेत.
शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर हे स्वतः चिखली किंवा सिंदखेडराजा मतदारसंघातून उभे राहण्याची शक्यता आहे. बुलढाण्यातून लढण्यासाठी जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी दौरे सुरू केले आहेत. मेहकर, सिंदखेडराजा, बुलढाणा या तीन मतदारसंघांवर शिवसेना (ठाकरे) पक्षाने दावा सांगितलेला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात या जागा त्यांना मिळतील की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.
सात मतदारसंघांचे असे होईल वाटप ?
बुलढाणा जिल्ह्यात एकूण सात विधानसभा मतदारसंघ आहेत. सद्यस्थितीत शिवसेना दोन, काँग्रेस चार तर राष्ट्रवादीकडे एक मतदारसंघ आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि शरदचंद्र पवार गट हे महाविकास आघाडीत आले. याशिवाय उद्धव गटही महाविकास आघाडीत आहे त्यामुळे जिल्ह्यातील सात मतदारसंघांमध्ये बुलढाणा, मेहकर आणि सिंदखेडराजा उद्धव गटाकडे आहेत. तर मलकापूर, खामगाव आणि चिखली हे मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ जाण्याची चिन्हे आहेत.