Congress reaction : संजय राऊत यांनी नौटंकी बंद करावी तसेच काय बोलावं याच्या मर्यादा ठरवाव्या. एखाद्या छोट्या कार्यकर्त्यासारखे वक्तव्य करू नये अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुनावले. त्यांच्या बोलण्यातून उद्विग्नता व्यक्त झाली. सांगलीचा विषय सामोपचाराने सोडवू असेही ते म्हणाले.राज्यातील सरकार संविधान विरोधी आहे त्यामुळे विकासाची अपेक्षा गैर आहे. या सरकार विरोधी आम्ही एकत्रित लढा उभारला आहे तसेच या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी ताकद दाखवून देईल. यासाठी आम्ही कंबर कसली आहे.
खडसे भाजपात जातील असे वाटत नाही
एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे याविषयी नाना पटोले म्हणाले, मला वाटत नाही ते भाजपमध्ये जातील, ते स्वाभिमानी नेते आहेत. भाजपमध्ये वाईट ट्रीटमेंट मिळाल्याने आपले असे मत आहे. त्यांच्याकडे बलाढय स्वयंघोषित विश्व गुरू असताना याला घ्या त्याला घ्या, असे करण्याची गरज काय असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटी रुपयांचा गैरप्रकार केल्याचा आरोप भाजपकडून झाला मग त्यांनी पैसे घेतले का आणि आदर्श घोटाळ्यातही पैसे घेतले का, हे प्रश्न अनुत्तरित राहतात. कारण भाजपात आले की शुद्धीकरण होते असे पटोले म्हणाले. रामटेक मध्ये भाजपचा डमी उमेदवार आहे. नागपुरातही डमी उमेदवार असल्याचा आरोप पटोले यांनी केला. एकीकडे मत मागणार नाही म्हणाले आणि आता गल्लोगल्ली फिरत आहेत. भाजपची विक्षिप्त मानसिकता ओळखून आहे.
या देशातील जनते समोर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी अनके वर्षांपासून आंदोलन केली. परंतु भाजपपासून सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रात सरकार आले तर जुनी पेन्शन लागु करू, सध्या केंद्रातील निवडणूक असल्याने ते जाहीरनाम्यात नाही असे त्यांनी यासंदर्भात प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.ही मंडळी संविधान संपवायला निघाली
बावनकुळे यांचा किती अभ्यास आहे मला माहित नाही. परंतु ते विद्वान आहेत. हे लोक आज संविधान संपवायला निघाले आहेत. अशा शब्दात त्यांनी सत्ताधा-यांवर बोचरी टीका केली. भाजपचे खाण्याचे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत असे ते म्हणाले.
आंबेडकरांपुढे मैत्रीचाच हात
लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. तरी देखील वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या पुढे अजूनही मैत्रीचा हात आहे. आम्ही प्रस्ताव दिला आहे त्यांनी विचार करावा. गिरीश महाजन यांच्या सारख्यांसाठी लोकशाही पर्व मस्ती करण्यासाठी आहे असे सांगून पटोले म्हणाले यांना फोबिया झाला. त्यांना फील गुड वाटते पण 10 वर्षात केंद्र सरकारची असलियत दिसली आहे. मात्र,उदयन राजे महाराज यांच्या बद्दल बोलणे त्यांनी टाळले.