Assembly Election : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून प्रत्येक पक्षामध्ये गृहयुद्ध सुरू आहे. यामध्ये विदर्भाचे प्रवेशद्वार असलेला बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघ चांगलाच गाजतोय. भाजपमधील दोन दिग्गज नेते सध्या एकमेकांवर गंभीर आणि खालच्या स्तरावरचे आरोप करीत आहेत. या ठिकाणी भाजपचे ज्येष्ठ नेते चैनसुख संचेती यांना भाजपच्याच नेत्यांनी टोकाचा विरोध केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
आरोप..
मलकापूर मतदारसंघ सध्या राजेश इकडे यांच्या रूपाने काँग्रेसकडे आहे. त्यांनी चार वेळा आमदार राहिलेले भाजपाचे चैनसुख संचेती यांचा 2019 च्या निवडणुकीमध्ये पराभव केला होता. यानंतर या निवडणुकीमध्ये पुन्हा चैनसुख संचेती हेच उमेदवार राहणार असल्याचे चित्र आहे. असे असताना आता भाजपामधीलच दोन नेते आपसात भिडले आहेत.
राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता मलकापूर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला भाजपच्या नेत्यांनीच टोकाचा विरोध केला आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते व मलकापूर विधानसभेतील इच्छुक उमेदवार चैनसुख संचेती यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवचंद्र तायडे यांना माजी आमदार चैनसुख संचेती यांनीच राजकारण करीत पदावरून खाली घेतले होते. याचा वचपा घेण्यासाठी आता शिवचंद्र तायडे हे सर्वच तयारीने समोर आले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते एकाच पक्षात असताना सुद्धा संचेती यांचा प्रखर विरोध करताना दिसून येत आहे.
भाजपचा गड राहिलेला हा मतदारसंघ कायम चर्चेत असतो. या मतदारसंघात स्वातंत्र्यानंतर भाजपचेच वर्चस्व राहिलेले आहे. चार वेळा जिंकलेले चैनसुख संचेती भाजपचे जेष्ठ नेते आहेत. यावेळेस या मतदारसंघातून प्रबळ दावेदार आणि इच्छुक उमेदवार आहेत. मात्र त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. कारण भाजपच्या नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध दंड थोपटले आहेत. चैनसुख संचेती अध्यक्ष असलेल्या मलकापूर अर्बन बँकेच्या अडचणी, कृषी उत्पन्न बाजार समितीतील अविश्वास ठराव आणि चैनसुख संचेती यांनी मलकापूर शहरात केलेले अतिक्रमण हे सर्व विषय घेऊन आता भाजपचेच नेते त्यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत.
तायडेंचा चैनसुख संचेतींवर हल्लाबोल
भाजपचे ज्येष्ठ नेते शिवचंद्र तायडे म्हणाले की, ‘माझ्या पत्नीसाठी मी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. मलकापूर मतदारसंघात बहुजनांचा लोकप्रतिनिधी असावा अशी जनभावना आहे. चैनसुख संचेती यांनी मलकापूर अर्बन बँकेच्या माध्यमातून लाखो लोकांच्या कोट्यवधीच्या ठेवी बुडवल्यात. अशा भ्रष्टाचारी माणसाला लोक मतदान करणार नाहीत. चैनसुख संचेती हा बेशरम माणूस लोकांचे पैसे बुडवून लोकांकडे उघड माथ्याने मत मागायला जातो.’ संचेती हा भ्रष्टाचारी माणूस आहे. त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी देऊ नये. पक्षाने चैनसुख संचेती यांना उमेदवारी दिल्यास आम्ही पक्षाचे काम करणार नाही. भाजप उमेदवाराचा पराभव झाल्यास त्याला कार्यकर्ते व आम्ही जबाबदार राहणार नाहीत, असेही शिवचंद्र पाटील म्हणाले.
भाजपच्या दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील हा वाद भाजपच्याच दोन गटात आहे. एक वर्षापूर्वी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 सदस्यीय संचालक मंडळाची निवडणूक पार पडली होती. यात भाजपच्या पॅनेलने 17 जागा जिंकत या समितीवर प्रभुत्व सिद्ध केले होते. तर त्यावेळी सभापती पदी भाजपचे शिवचंद्र तायडे यांची निवड करण्यात आली. मात्र मधल्या काळात संचेती आणि तायडे या दोन्ही नेत्यात बिनसलं आणि रावेर लोकसभा निवडणुकीच्या निमित्याने हे संबंध अधिक विकोपाला गेले. यामुळे भाजपचे एकहाती वर्चस्व असलेल्या बाजार समितीचे सभापती, आणि भाजप नेते शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात भाजपच्याच 14 संचालकांनी गेल्या 20 मे रोजी अविश्वास प्रस्ताव सादर केला होता.