Political War शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट आज (रविवार, दि. २५ अॉगस्ट) एकाच शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने आमने-सामने येत आहेत. एकीकडे ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा तर शिंदे गटाचा रोजगार मेळावा होणार आहे. सिल्लोडमध्ये रंगणारा शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आज दि. 25 आणि उद्या, दि. 26 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर दौर्यावर आहेत. यानिमित्ताने त्यांच्या उपस्थितीत शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दुपारी 2 वाजता सिल्लोड येथे प्रियदर्शिनी चौकात हा मेळावा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे संत एकनाथ रंगमंदिरात शिवसंकल्प मेळावा होणार आहे. दरम्यान याच वेळेस सिल्लोड येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
सत्तार धनुष्यबाण चिन्हावर..
अब्दुल सत्तार सिल्लोडमधून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडूनही आले. पण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडात सत्तार सहभागी झाले. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने सिल्लोमध्ये अधिक लक्ष घालायला सुरवात केली. सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद मर्यादित आहे. अब्दुल सत्तार यांनी सलग तीनवेळा या मतदारसंघातून विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. राज्यात महायुती असूनही यावेळी भाजप अब्दुल सत्तार यांच्या विरोधात काम करण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे घ्यावा, असा आग्रह आहे. स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिकांनी अंबादास दानवे यांच्याकडे धरला आहे. काही इच्छुकांनी लढण्याची तयारी दर्शवली आहे. तरीही महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता अधिक आहे.
आजचा शिवसंकल्प मेळावा संपल्यानांतर उद्या, सोमवार, दि. 26 ऑगस्टला सकाळी 10 वाजता पैठण येथे माहेश्वरी धर्मशाळेत शिवसंकल्प मेळावा होईल. त्यानंतर दुपारी 12.15 वाजता लासूर स्टेशन येथे लक्ष्मीनारायण लॉन्स येथे आयोजन होणार आहे. दुपारी 2 वाजता वैजापूर येथे त्यानंतर सायंकाळी 6 वाजता कन्नड येथे शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून आदित्य ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड शिवसंकल्प मेळाव्याची तयारी करीत आहेत.