Akola News : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे गटनेता गोपाल दातकर यांच्या विरोधात सिटी कोतवाली पोलिसांत अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात दातकर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने अनेक महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवित दातकर यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पोलिसांना दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे दातकर यांना उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे.
अकोला जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना अनेकदा पाहायला मिळतो. भाजपच्या महिला सरपंचानी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखावर गंभीर आरोप केले होते. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे सदस्य गोपाल दातकर यांच्यावर गुन्हे दाखल झाले. अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रमाणे ॲट्रॉसिटी अंतर्गत हे गुन्हे दाखल झाले. भाजपच्या एका महिला सरपंच यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला होता.
सभेतील वाद
अकोला जिल्हा परिषद मध्ये 11 जुलै रोजी गोपाल दातकर आणि त्यांचा समवेत ठाकरे गटाचे काही पदाधिकारी आणि हिंगणी गावचे सरपंच महिलांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. महिला सरपंच यांच्या तक्रारीवरून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे गोपाल दातकर यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे उद्धव गटाचे आमदार नितीन देशमुख आक्रमक होत पोलिस अधीक्षकांची भेट घेतली होती.
दोन आठवड्यात उत्तर द्या
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षातील सीसीटीव्ही फूटेज तसेच इतर काही व्हिडीओ तपासून सखोल चौकशी करावी. दातकर यांच्यावर दाखल केलेला गुन्हा भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या दबावाला बळी पडून केल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी केला होता. याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी दातकर यांनी प्रथम जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केलेला अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला. जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने गोपाल दातकर यांना अंतरीम जामीन मंजूर केला आहे. पोलिसांना दोन आठवड्याच्या आत उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. न्यायालयात गोपाल दातकर यांच्याकडून ॲड. आनंद राजन देशपांडे यांनी बाजू मांडली.