Shiv Sena Get Together : विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने कामगिरी जरी चांगली केली असली, तरी अपेक्षित यश न मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच जोरदार रणनीती आखली आहे. शिवसेनेकडून आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मेळावे घेण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 6 जुलैला छत्रपती संभाजीनगर दौऱ्यापासून या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात होत आहे.
लोकसभा निवडणूक संपली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला होता. याच सामन्यात आणखी एक सामना रंगला होता तो शिवसेना विरुद्ध शिवसेना. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी जून महिन्यातच शिवसेनेतील 40 आमदारांना फोडून मोठे बंड केले होते. एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत सत्तेत सहभागी होत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
पुढे शिंदे यांच्या गटाला ‘शिवसेना’ हे पक्षाचे अधिकृत नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे अधिकृत निवडणूक चिन्ह देखील मिळाले. त्यामुळे शिवसेनेचे दोन पक्ष झाले. लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना रंगला होता. या निवडणुकीत फुटीनंतरच्या पहिल्याच लोकसभेत शिवसेना उद्धव ठाकरे यांना जागा कमी मिळाल्याने तसेच ठाणे, कल्याण आणि मुंबईतील उत्तर- पश्चिम आणि कोकणातील दोन जागा हातून गेल्याने ठाकरेंची शिवसेना आता आगामी विधानसभा निवडणुकीवर अधिक फोकस करणार आहे.
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना चेतना आणि ऊर्जा देण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. त्याची सुरुवात शिवसेना ठाकरे गटाचा गड असलेल्या संभाजीनगरातून होणार आहे. संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत हा गड हातून गेल्याने येथे शिवसेना बॅकफूट वर आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता 7 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर जाणार आहेत.
पुन्हा शिवसंकल्प मेळावा
लोकसभा निवडणुकीची सुरुवात मेळाव्यापासून करणारी शिवसेना पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीची सुरुवातही मेळाव्यापासून करणार आहे. संभाजीनगरात ‘शिवसंकल्प’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गट विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मेळावे घेण्याचा निर्णय घेतला असून, 6 जुलैला छत्रपती संभाजीनगर दौऱ्यापासून या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात होत आहे.
‘शेतकऱ्यांना न्याय देणार, गद्दारांचा कडेलोट करणार’ असे या ‘शिव संकल्प’ मेळाव्याच्या आमंत्रण पत्रिकेचे शीर्षक आहे. त्यामुळे संभाजीनगरातील विधानसभासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. रविवारी 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजता संभाजीनगरातील सूर्या लॉन्स बीड बायपास येथे शिवसेनेतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्यानंतर महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष तयारी करत आहेत. दुसरीकडे कॉंग्रेसला विदर्भासह 13 जागा मिळाल्याने पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणूकीचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा उद्धव ठाकरे असतील, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रसचे नेते शरद पवार यांनी आक्षेप व्यक्त केला होता. शिवसेनेची ताकद ज्या ठिकाणी आहे, तिथे उद्धव ठाकरे येत्या दौऱ्यात आपल्या कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांची मेळावे घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीतही शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगण्याची शक्यता आहे.