लोकसभेच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी देखील सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून सध्या विदर्भात चाचपणी सुरू आहे. शिवसेनेकडून ‘मिशन विधानसभा’ हे ध्येय ठेऊन नियोजन करण्यात आलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत सोमवारपासून (दि. 15) पश्चिम विदर्भात विधानसभा निहाय आढावा घेत आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेला जनाधार अधिक भक्कम करणार. त्यासाठी सर्वसामान्य जनतेत जाऊन त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली जाणार. सर्वाधिक जागा मिळवून देण्यासाठी सर्व प्रकारचे मतभेद विसरून एकजुटीने कामाला लागा, असे आवाहन माजी केंद्रिय मंत्री शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम विदर्भात आहेत. येथील पाच जिल्ह्यांत विधानसभा निहाय आढावा घेणे सुरू केले आहे. त्यांनी आगामी विधानसभेच्या दृष्टीने स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमिटी हॉलमध्ये ही बैठक झाली. या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख आ. नितीन देशमुख, माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी आमदार विश्वास नांदेकर, संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाळकर, संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर आदीची उपस्थिती होती.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाला मोठ्या प्रमाणात जनाधार मिळाला आहे. शिवसेनेसोबत जनमत अधिक भक्कम आहे. शिवसेना सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडत आहे. त्यांच्या हितासाठी लढत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत फळाला आली. आगामी विधानसभेत शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळवण्यासाठी पदाधिकाऱ्याने एकजुटीने कामाला लागावे. लोकशाही मूल्यांची जोपासना करण्यासाठी व प्रखर हिंदुत्वाचा विचार ज्वलंत ठेकण्यासाठी शिवसैनिकाने सज्ज व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले.
विधानसभानिहाय घेतला आढावा
अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी सहसंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, आजी माजी आमदार, खासदार, जिल्हासंघटक, जिल्हा समन्वयक, विधानसभाप्रमुख, विधानसभासंघटक, विधानसभा समन्वयक, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका, तालुका संघटिका, शहरसंघटिका, शेतकरी आघाडीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अनेकांचे म्हणणे ऐकून घेतले.
मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणी
खा. अरविंद सावंत यांच्याकडून अमरावती 8, बुलढाणा 7, वर्धा 4, यवतमाळ 7 अशा विधानसभा उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. सकाळी 11 ते रात्री 11 ही बैठक चालली. कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो? संबंधित उमेदवाराची बलस्थाने, संघटनात्मक बांधणी, एकनिष्ठता, कार्यपध्दती विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. फक्त निवडणूक लढविणाऱ्या नव्हे तर निवडून येणाऱ्या उमेदवारास प्राधान्य असेल, असेही अरविंद सावंत यांनी सांगितले.
आघाडीचे वर्चस्व
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 30 उमेदवार निवडून आले. सांगलीतील विशाल पाटलांनीही पाठिंबा दिल्याने संख्या 31 वर पोहोचली. दुसरीकडे महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं. शिवसेना ठाकरे गटाचे 9 खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या ठाकरे गटाकडून आता विधानसभेची तयारी सुरू झाल्याचं दिसून येतंय.
तयारीला वेग!
महाविकास आघाडीकडून लवकरच मुंबईमध्ये राज्यभरातील तिन्ही पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. ही एक भव्य सभाच असेल. लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी मतदारांचे आभार मानले जातील. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीचे रणशिंगही फुंकले जाईल. निवडणुकीला सामोरे जाताना कोणते मुद्दे मतदारांपुढे मांडायचे? महाविकास आघाडीचा जाहीरनामा कसा असेल? या संदर्भात प्राथमिक चर्चा होईल.