महाराष्ट्र

Shiv Sena : विखे-पाटलांना पालखीत बसवून आणणार!

Radhakrishna Vikhe Patil : ठाकरेंच्या शिवसेनेचा पालकमंत्र्यांच्या विरोधात एल्गार

जिल्ह्याच्या पालकत्वाचा विसर पडलेल्या राधाकृष्ण विखे-पाटलांना पालखीत बसवून अकोल्यात घेऊन येऊ, असा इशारा उद्धव ठाकर गटाने दिला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना अहमदनगर येथे जाऊन अकोल्यात घेऊन येऊ. त्यासाठी 24 सप्टेंबरला हजारो शिवसैनिक पालकमंत्र्यांच्या नगर येथील निवासस्थानी धडकतील. त्यांना पालखीत बसवतील आणि जिल्ह्यात आणून येथील परिस्थितीचे दर्शन घडवतील, असे आमदार नितीन देशमुख यांनी म्हटले आहे.

जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारणाऱ्या पालकमंत्र्यांना लाज वाटायला पाहिजे. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे. अशा परिस्थितीत पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत. त्यामुळे आपण त्यांना घेऊन येण्याची तयारी केली आहे, असेही देशमुख म्हणाले.

विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून क्वचित अपवाद वगळता ते जिल्ह्याकडे फिरकलेच नाहीत. याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. आमदार देशमुख यांनी 14 सप्टेंबरला पत्रकार परिषद घेऊन विखे पाटील यांना जिल्ह्यात आणण्याची तयारी केल्याचे जाहीर केले.

कायदा सुव्यवस्था बिघडली!

आमदार देशमुख म्हणाले, ‘गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक राहिला नाही. जिल्ह्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या. हत्या, चोरी अशा घटनांची लांबलचक यादी आहे. बदलापूरच्या घटनेनंतर अकोल्यातही काजीखेड येथे एका शिक्षकाने सहा मुलींचा लैंगिक छळ केला. जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. तरीसुद्धा पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात पाय ठेवलेला नाही. त्यामुळे 23 तारखेपर्यंत पालकमंत्री विखे पाटील जिल्ह्यात आले नाहीत. शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. तर 24 सप्टेंबरला त्यांना घ्यायला नगर येथे जाईल. त्यांना पालखीत बसवून जिल्ह्यात आणेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. जर त्यांनी येण्यास नकार दिला तर त्या ठिकाणीच आंदोलन करू असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.

Akola Congress : राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आंदोलन

फडणवीसांकडून निराशा

यापूर्वीही जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तेव्हा देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली होती. त्यावेळी त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्यांनीही अपेक्षाभंग केला. नवे पालकमंत्री तरी जिल्ह्यासाठी काहीतरी करतील अशी आशा होती. मात्र पुन्हा निराशाच पदरी पडली, अशी खंतही देशमुख यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांचं राज्यातील सर्व पालकमंत्र्यांकडे लक्ष होतं. त्यामुळे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू सक्रिय होते, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

शिवसेना आक्रमक!

पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यातील उपस्थितीतीवरून भाजपला लक्ष करण्याची संधी ठाकरे गटाला मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतिचा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो. हाच मुद्दा हेरून आता शिवसेना ठाकरे गट आक्रमक होणार आहे, असे चित्र आहे.

error: Content is protected !!