Bjp Vs Shivsena : लोकसभा निवडणुकीपूर्वी जनआंदोलन करून प्रशासन आणि सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा आंदोलन केले. उबाठा गटाचे शहरप्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात आज महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन करण्यात आले. पाणी कर वसुली मनमानी पद्धतीने होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
राज्यात शिवसेना दोन गटात विभागल्या नंतर शिवसेना ठाकरे गट सत्ताधाऱ्यांना चांगलाच धारेवर धरताना दिसत आहे. तर अकोल्यातही भाजपला कोंडीत पकडण्यासाठी विविध मुद्द्यांवर ठाकरे गट आंदोलन करीत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पीक विमा तसेच विविध मागण्यांसाठी महापालिकेवर धडक देण्यात आली होती. मालमत्ता कर, उड्डाणपूल व अंडरपासचा मुद्दाही शिवसेनेने उचलला होता. आता नवीन मुद्दा हाती घेतला आहे.
या मागणीसाठी केले आंदोलन!
अकोला महापालिका प्रशासनाकडून पाणी कर वसुली मनमानी पद्धतीने होत असल्याचा आरोप केला. आज महापालिका आयुक्त सुनील लहाने यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान उपायुक्त गीता ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. मात्र,तरीही आंदोलनकर्ते आंदोलनावर ठाम होते. ठोस आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती आहे.
महापालिका प्रशासन गोर गरीब जनतेला पाणी कर वसुली बाबत मनमानी करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. दरम्यान आंदोलनाची दखल न घेतल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
Crime News : गुन्ह्यात न अडकण्यासाठी केली कलाकारी; नसती उठाठेव पडली भारी
आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. महापालिकेत प्रशासन राज येण्यापूर्वी येथे भाजप सत्तेत होती. त्यामुळे स्थानिक मुद्द्यांवर शिवसेना ठाकरे गट भाजपला कोंडीत पकडण्याचा एकही मुद्दा सोडत नसल्याचे दिसत आहे. आता लोकसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळं ठाकरे गट अकोला शहरात आपल्यासाठी अनुकूल वातावरण तयार करताना दिसत आहे.