येणारे विधानसभा निवडणूक रंगतदार होणार असल्याची लक्षणे आतापासूनच दिसू लागली आहे. शिवसेना गटाची सभा चक्क नानांच्या साकोली या गृह तालुक्यात आयोजित करण्यात आली. साकोली विधानसभा लढण्यावर विचार विमर्ष करण्यासाठी ही सभा असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाकडून साकोलीत सभा आयोजित केल्याने शिंदे गटाने नानांच्या गृह जिल्ह्यात अतिक्रमण करण्यास सुरुवात केल्याची चर्चा जिल्ह्यात होऊ लागली आहे.
साकोली विधानसभा क्षेत्रातील साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्यातील शिवसेना शिंदे गट पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नीरज हॉटेल साकोली/सेंदूरवाफा येथे बैठक झाली. साकोली विधानसभा व नगर परिषदेची निवडणूक लढाविण्याचा एकमताने ठराव घेण्यात आला. या संदर्भात राज्यातील प्रमुखांना ही माहिती देण्यात आली.
शेतकऱ्यांच्या समस्येवरही चर्चा
लाखांदूर तालुका शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख देवचंद कावळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत, साकोली विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या समस्या पाहता, त्या सोडविण्यासाठी साकोली विधानसभा निवडणूक लढाविण्याचा ठराव घेण्यात आला आहे. सर्वानुमते साकोली विधानसभा निवडणुकीसाठी लाखांदूर तालुका प्रमुख देवचंद कावळे यांच्या नावावर सहमती झाली आहे. आता देवचंद कावळे यांना शिवसेनेने उमेदवारी द्यावी. अशी मागणी राज्य नेतृत्वाकडे करण्यात येणार आहे.
तसेच, साकोली नगर परिषदेची निवडणुक लढाविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यात सचिन घनमोडे, संदीप पंचभाई, महेंद्र जनबंधू, अविनाश ढोमके, मार्कंड कापगते, सचिन करंजेकर, श्याम चांदेवार, ज्योत्स्ना मनोज गजभिये, संगीता राकेश चौधरी, प्रमोद शेंडे, लक्ष्मीकांत चुन्ने, उत्तम वासनिक यांच्या नावावर सहमती दर्शविली असून सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले आहे.
साकोली विधानसभा तसेच नगर परिषदेची निवडणूक शिवसेनेसाठी महत्वाची असल्याने, ही तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत लाखांदूर शिवसेना तालुका प्रमुख देवचंद कावळे यांच्या नेतृत्वात सौरभ वैद्य, मार्कंड कापगते गौरव भैसारे, प्रमिला गोटेफोडे यांनी यावेळी पक्षात प्रवेश केला. सभेला यशस्वी करण्यासाठी लाखांदूर, लाखनी व साकोली तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.