Mumbai : महाविकास आघाडीतील विरोधीपक्षांना कुठलीही खातरजमा न करता आरोप करण्याची सवय झाली आहे. पण त्यांचा खोटारडेपणा आता उघड झाला आहे, अशी टीका शिवसेनेचे (शिंदे गट) मुख्य सहप्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केली आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्यांनी विजय वडेट्टीवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
महायुती सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे विरोधीपक्ष सैरभैर झाले आहेत. विरोधीपक्ष नेत्यांचा खोटारडेपणा आता उघड झाला आहे, अशी टीका डॉ. वाघमारे यांनी केली आहे. माधुरी नष्टे आणि अजय नष्टे यांनी खोट्या दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे एमपीएससीची फसवणूक केल्याचा आरोप वड्डेटीवारांनी केला होता. हे आरोप खोटे असून माधुरी आणि अजय ओबीसी प्रवर्गातून एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, असे वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.
माधुरी नष्टे या २०१४ बॅचच्या अधिकारी आहेत. तर त्यांचे बंधू अजय नष्टे २०१७ बॅचचे अधिकारी आहेत. बहिण आणि भाऊ दोघेही उमेदवार एमपीएससीमध्ये ओबीसी प्रवर्गातून उत्तीर्ण झालेले आहेत. पण वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर दिव्यांग प्रवर्गातून उत्तीर्ण झाल्याचा आरोप केला होता, असेही डॉ. वाघमारे म्हणाले.
विरोधी पक्षांनी टीका करताना भान बाळगायला हवे. विरोधीपक्षनेते पदावरील व्यक्तीने बेछुट आरोप करुन आपले अज्ञान आणि बालबुद्धीचे प्रदर्शन करण्याऐवजी योग्य माहिती घेऊन बोलायला हवे. लोकसभा निवडणुकीत खोटं बोलून लोकांची मते मिळवली. पण आता समाज त्यांच्या खोट्या नरेटिव्हला भुलणार नाही, असा टोला डॉ. वाघमारे यांनी लगावला.
कोण म्हणतं पैसे नाहीत?
राज्यावर साडेसात लाख कोटींचे कर्ज आहे. हे कर्ज ‘जीडीपी’च्या केवळ १८.३८ टक्के इतके आहे. राज्य सरकारला ‘जीडीपी’च्या २५ टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येते. पुरवणी मागण्यांचा विचार केला तरी राज्याचे कर्जाचे प्रमाण २०.५० टक्क्यांपर्यंत गेले आहे. एका बाजूला कर्ज घेत असताना महाराष्ट्राची उत्पादन क्षमता ३८ लाख कोटींच्या घरात गेली आहे. त्यामुळे सरकारवर कर्जाचा काहीही परिणाम होत नाही. कर्ज घेऊन सरकार सर्व सामान्यांच्याच विकासासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे योजनांच्या पूर्ततेसाठी सरकारकडे पैसे नाही हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे, अशी टीका डॉ. वाघमारे यांनी केली.
ठाकरेंकडून बहिणींचा अपमान
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर टीका केली. त्यांनी ही टीका करून महाराष्ट्रातील बहिणींचा अपमान केला आहे, असे वाघमारे म्हणाले. धारावी पुनर्विकास प्रकल्पांवरही त्यांनी टीका केली. ही टीका म्हणजे निव्वळ थोतांड आहे. उद्धव ठाकरे म्हणतात उबाठाने काढलेला मोर्चा हा गोरगरिबांच्या घरांसाठी नव्हता. अदानीला मिळणाऱ्या टीडीआरच्या विरोधात होता. म्हणजे अदानीकडून उबाठाला काही मिळावे यासाठी काढला होता का? असा प्रश्न डॉ. वाघमारे यांनी उपस्थित केला.