National Politics : लोकसभा निवडणुकीत एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह एनडीएच्या विविध खासदारांनी मंत्रिपद आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र एनडीएच्या मंत्रिमंडळात भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि रामदास आठवलेंना मोठा धक्का दिला. दोन्ही पक्षांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले नाही. दुसरीकडे अजित पवार यांनी राज्यमंत्री पद नाकारलं. याचे राजकीय पडसाद महाराष्ट्रात उमटण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. सकाळपासून कुणाला मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता लागून होती. दुसरीकडे महायुती सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या घटकपक्षांना नेमके किती मंत्रिपद मिळणार याची चर्चा सुरू होती. दिवसभर काही पक्षात नाराजीनाट्य चालले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे पक्षात नाराजी पसरली. दुसरीकडे मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपाइं आठवले गटाला एकच मंत्रीपद मिळाले.
एकही जागा न लढणारे मंत्री
रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या पक्षाने लोकसभेची एकही जागा लढवली नाही. त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातही नाराजी आहे. अठराव्या लोकसभेत निवडून गेलेले खासदार नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, रामदास आठवले यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह भाजपच्या खासदार रक्षा खडसे आणि पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
शपथविधीच्या कार्यक्रमात मोदींनी एकनाथ शिंदे आणि रामदास आठवले यांना मोठा धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे महाराष्ट्रात 7 खासदार निवडून आले आहेत. तरीही त्यांच्या पक्षाला एकही कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेले नाही. रामदास आठवले यांना गेल्या सरकारमध्येही राज्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. यावेळीदेखील त्यांना राज्यमंत्रीपदच देण्यात आलं आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा होती.
PM Oath Ceremony : पटेल म्हणाले मी नाही बोललो; सोहळ्यालाही दांडी
दादा म्हणाले, थांबतो पण हे नको
महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटालाही भाजपकडून राज्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. पण अजित पवार गटाने राज्यमंत्रिपदाची ऑफर नाकारली. अजित पवार गटाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी हवी होती. पण भाजपकडून त्यांना केवळ राज्यमंत्रिपदासाठी विचारणा करण्यात आली. त्यामुळे अजित पवार गटाने ती ऑफर नाकारली. आगामी काळात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, तेव्हा अजित पवार गटाचा विचार केला जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.