Rajesh Mishra : महाविकास आघाडीमध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही अशी घोषणा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतरही अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणारे शिवसेनेचे राजेश मिश्रा यांच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महाविकास आघाडीमध्ये अकोला पश्चिमची जागा काँग्रेसच्या खात्यात आहे. या मतदारसंघातून काँग्रेसने साजिद खान पठाण यांना उमेदवारी दिली होती. साजिद खान हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत.
अकोल्यातील भाजपच्या गडाला साजिद खान यांनी सुरुंग लावला आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार रिंगणात असतानाही शिवसेनेचे राजेश मिश्रा यांनी पंढरपूर केली होती. अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी अकोला पश्चिम मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र निवडणुकीत मिश्र आहे मोठा कमाल दाखवू शकले नाही. केवळ काही हजार मतांवर त्यांना समाधान मानावे लागले. निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झालेला नसला तरी मिश्रा आणि शिवसेनेने आघाडीचा धर्म पाळला नाही, असे सांगण्यात येत आहे.
मोठी रस्सीखेच
जागा वाटप सुरू असताना अकोला पश्चिम विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. याच मतदारसंघावरून अन्य काही मतदारसंघाच्या बाबतीतही आघाडी बिघाडी निर्माण झाली. शिवसेनेकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रारही करण्यात आली. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघावरून काँग्रेसमधीलच दोन ज्येष्ठ नेते आमने-सामने आले होते. एका नेत्याचं म्हणणं साजिद यांना उमेदवारी द्यावी असं होतं. दुसऱ्या नेत्यांना माजी मंत्री अजहर हुसेन यांचे सुपुत्र डॉक्टर झिशान हुसेन यांचं नाव पुढे केलं. दोन्ही नावांवर एकमत न झाल्याने निर्णयाचा चेंडू राहुल गांधी यांच्या कोर्टात टाकण्यात आला.
राहुल गांधी यांनी सहाजिकच साजिद खान पठाण यांना पसंती दर्शवली. काहीही झाले तरी साजिद खान यांनाच उमेदवारी मिळेल, हे वृत्त ‘द लोकहित’ने 3 ऑक्टोबर रोजीच प्रकाशित केले होते. त्याप्रमाणे साजिद यांनाच उमेदवारी मिळाली. ही सगळी घडामोडी सुरू असताना राजेश मिश्रा अपक्ष उमेदवार म्हणून कर्ज दाखल करून मोकळे झाले. त्यांना शिवसेनेकडून कोणतीही अडवणूक करण्यात आली नाही. मात्र निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मदतही करण्यात आली नाही. त्यामुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आघाडीचा धर्म पाळला नाही, असं आता बोललं जात आहे.
मोठा पराभव
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. विधिमंडळात विरोधी पक्षनेते पदही मिळवण्यासाठी आघाडीला धडपड करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत ज्या ज्या मतदारसंघांमध्ये आघाडीचा धर्म पाळला गेला नाही, त्या ठिकाणी आता तीनही पक्षांना मलमपट्टी करावी लागणार आहे. अकोल्यामध्ये साजिद खान यांचा विजय अवघ्या बाराशे मतांनी झाला आहे. शिवसेनेचा उमेदवार नसता तर आणखी काही मतांची भर विजयात पडली असती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे आघाडी असताना सुद्धा बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांवर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोणती कारवाई करेल? याकडे सर्वांचे लक्ष आहे.