महाराष्ट्र

Lok Sabha Election : संजय गायकवाड म्हणतात ‘गेम प्लान सक्सेस’ झाला

Buldhana Constituency : भाजपावर दबाव टाकण्यासाठी भरला होता उमेदवारी अर्ज

Shiv Sena On BJP : बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी (ता. 28) सायंकाळी शिवसेनेकडून जाहीर झालेल्या आठ उमेदवारांच्या यादीमध्ये खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावाचे घोषणा करण्यात आली आहे. आपण भाजपवर दबाव टाकण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, असा गौप्यस्फोट बुलढाणा येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला. बुलढाणा लोकसभेत महायुतीचा उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली नसतानाच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अचानक उमेदवारी अर्ज दाखल केला.

गायकवाड यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जामुळे बुलढाण्याच्या राजकीय क्षेत्रात चर्चाना उधाण आले. संजय गायकवाड यांनी अपक्ष आणि शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला होता. कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी उमेदवारी अर्ज भरल्याचे गायकवाड यांनी सांगितले होते. शुक्रवारी (ता. 29) बुलढाणा येथे पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या भाषणातून खासदार प्रतापराव जाधव यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. त्यामुळे पुन्हा संभ्रम वाढला. मेळावा संपताच आमदार संजय गायकवाड यांनी प्रसिद्धी माध्यमांचाजवळ गोप्यस्फोट केला. ते म्हणाले की, उमेदवारी अर्ज दाखल करताच प्रतापराव जाधव यांची उमेदवारी जाहीर झाली. हाच आपला ‘गेम प्लान’ होता. निवडणुकीची ती रणनीती होती. आमदार संजय गायकवाड यांच्या या खुलाशामुळे बुलढाण्यात सुरू झालेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

संजय गायकवाड यांनी अर्ज भरल्यानंतर शिवसेनेतील नेत्यांनीही सावध भूमिका व्यक्त केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ गायकवाड यांना फोन केला होता. त्यावर गायकवाड यांनी आपण शिंदे यांच्या शब्दाबाहेर नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांना दिली होती. अर्ज भरल्यानंतर व जाधव यांना उमदेवारी जाहीर होताच दुसऱ्याच दिवशी गायकवाड यांनी आपली बाजू स्पष्ट केल्याने नेमके चाललेय काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात भाजपने सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात प्रतापराव जाधव यांच्या पाठिशी जनमताचा कौल नसल्याने पुढे आल्याचा दावा भाजपने केला होता. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी पक्षातील नेते आग्रही होते. गायकवाड यांच्यासह शिवसैनिकांचा या तडजोडीला विरोध होता.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!