Cabinet Expansion : कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी सोहळा अवघ्या काही तासांवर आला असताना नाराजीनाट्य सुरू झाले आहे. भंडाऱ्यातील शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राजीनामा सादर करीत आपली नाराजी उघड व्यक्त केली आहे. नरेंद्र भोंडेकर यांच्याकडे पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुखपद आहे. त्यांच्या विजयासाठी स्वतः माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडारा जिल्ह्यामध्ये प्रचार केला होता. भोंडेकर यांना कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केले जावे अशी अपेक्षा होती.
मंत्र्यांची संभाव्य यादी जाहीर झाली. त्यानंतर अनेकांना पक्षाच्या नेत्यांकडून शपथविधीसाठी फोन केले गेले. नरेंद्र भोंडेकर यांनी या फोनसाठी अखेरच्या क्षणापर्यंत वाट पाहिली. मात्र फोन न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या संघटनात्मक पदांचा राजीनामा एकनाथ शिंदे यांना पाठवला. त्यामुळे मंत्री पद न मिळाल्यामुळे शिवसेनेमध्ये आता नाराजीनाट्याला भोंडेकर यांच्यापासून सुरुवात झाल्याचे बघायला मिळत आहे.
अनेकांची खदखद
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेल्या कॅबिनेटमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. भारतीय जनता पार्टीने देखील काही नेत्यांना मंत्री पदापासून दूर ठेवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील हाच फार्मूला वापरला आहे. छगन भुजबळ, धनंजय मुंडे अशा ज्येष्ठ नेत्यांचा मंत्र्यांच्या यादीमध्ये समावेश नाही. शिवसेनेकडूनही असेच काहीसे करण्यात आले आहे. मात्र भाजपच्या तुलनेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता खदखद वाढली आहे. याच नाराजीतून नरेंद्र भोंडेकर यांनी पदांचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर नरेंद्र भोंडेकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. सरकारने त्यावेळी त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली होती. अनेक दिवसांपर्यंत ही सुरक्षा कायम ठेवण्यात आली होती. त्यानंतर नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला. त्यांचा प्रचार करण्यासाठी एकनाथ शिंदे हे स्वतः भंडारा जिल्ह्यामध्ये आले होते. त्यामुळे निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नरेंद्र भोंडेकर यांना मंत्री पदाची अपेक्षा होती.
Cabinet Expansion : देवाभाऊंच्या कॅबिनेटमध्ये निम्मे चेहरे नवीन
भंडारा-गोंदिया जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचा दबदबा आहे. याशिवाय भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके हे देखील भंडारा जिल्ह्यामध्ये वर्चस्व कायम ठेवून आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये डॉ. परिणय फुके यांची वर्णी लागेल, असे वाटत होते. परंतु महायुतीमधील तीनही पक्षांनी सगळ्यांनाच अनपेक्षित धक्का दिला आहे. अनेक ज्येष्ठमंत्र्यांनाही कॅबिनेटपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये नरेंद्र भोंडेकर यांचाही समावेश आहे. परंतु मंत्री पद न मिळाल्याने भोंडेकर यांच्यापासून नाराजी उघड व्हायला सुरुवात झाली आहे.