Mahayuti 2.0 : सरकारमधील मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून भाजपने काही नावांवर आक्षेप घेतला आहे. यामध्ये शिवसेनेचे नेते तथा यवतमाळचे माजी पालकमंत्री संजय राठोड यांचा समावेश आहे. विकासाच्या बाबतीत संजय राठोड हे नापास झाल्याचं सांगण्यात येत आहे. मंत्रिपदावरून होत असलेल्या चर्चेमुळे राठोड सध्या चांगलेच ‘डिस्टर्ब’ झाले आहे. त्यामुळे त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असं कसं होऊ शकते? असा प्रति प्रश्न विचारला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये संजय राठोड हे वनमंत्री होते. त्यावेळी पूजा राठोड नावाच्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणात राठोड यांचे नाव आले होते. त्यावरून भारतीय जनता पार्टीने राज्यभरामध्ये चांगलेच रान पेटवले होते. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा घेतला होता. वारंवार प्रयत्न करू नये ठाकरे यांनी राठोड यांना मंत्रिपद पुना बहाल केले नाही. त्यामुळे राठोड हे परिवारासह उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते.
पुनर्वसन झाले
मुंबईला गेल्यानंतर उद्धव ठाकरे हे संजय राठोड यांना धड भेटलेही नाहीत. त्यामुळे सत्तेपासून दूर असलेल्या राठोड यांनी शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हात धरला. महायुतीचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांचे पुनर्वसन केले. महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना पुन्हा कॅबिनेट मंत्री पद मिळाले. मात्र त्यानंतर ठाकरेंची शिवसेना संजय राठोड यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाली. वाशिम आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी राठोड यांच्या विरोधात जाहीर सभांमधून टीका केली.
लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यात आला. तेव्हापासूनच राठोड यांचे काय होणार? अशी चर्चा सुरू होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांना संधी दिली. विधानसभा निवडणुकीनंतर आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये वादग्रस्त लोक नको आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या यादीत असलेल्या संजय राठोड यांच्या नावापुढे फडणवीस यांनी लाल शाईने फुली मारली आहे.
CM Medical Help Cell : शिंदेंचे विश्वासू मंगेश चिवटे यांना हटविले
माजी मंत्री व्यथित
यासंदर्भातील वृत्त प्रकाशित होऊ लागल्यानंतर संजय राठोड काहीसे हादरले आहेत. विकासाच्या बाबतीत आपण नापास होऊ शकत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टीकडून यवतमाळमध्ये संजय राठोड यांना मंत्री पद देण्याच्या बाबतीत सहमती नाही. या जिल्ह्यातून यापूर्वी मदन येरावार आणि अशोक उईके यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक हे देखील पुसद विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहे. इंद्रनील नाईक हे राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या नाईक परिवारातील आहेत. त्यामुळे संजय राठोड यांच्या ऐवजी येरावार, उईके आणि नाईक यांच्या नावावर विचार सुरू आहे.
येरावार, उईके यांनी यापूर्वी राज्य मंत्रिमंडळात काम केले आहे. इंद्रनील नाईक यांना मात्र आतापर्यंत संधी मिळालेली नाही. त्यामुळे अजित पवार गट आणि भाजप नाईक यांच्या नावावर सहमत होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाल्यास पुसदच्या बंगल्यातून आमदार आणि मंत्री पदाची परंपरा कायम राहणार आहे.