महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून सुरू असलेल्या वादावर फुंकर मारण्याचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. रखडलेले जागा वाटप लवकरच होईल, असे सांगण्यात येते. याच मुद्यावरून संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यात चांगलीच जुंपली होती. या वादावरून वेगळीच अफवा पसरली. शिवसेना उद्धव ठाकरे गट मविआतून बाहेर पडणार, अशा बातम्या वाहिन्यांवर आल्या. भाजप शिवसेना (उध्दव ठाकरे) गट एकत्र येणार अशी अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरली. या अफवेचे स्पष्टीकरण देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना नाकीनऊ आले. या अफवांना अर्थ नाही, भाजपने त्या पेरल्या असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला.
दूरावलेले मित्र एकत्र येणार
जागा वाटपाच्या मुद्यावरून शिवसेना (उध्दव ठाकरे) गटाचे प्रवक्ते संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. हा वाद असाच धगधगत राहील, तोडगा निघणार नाही. असे चित्र रंगविण्यात येऊ लागले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर जागावाटपावरून मविआमध्ये हाणामारी होईल असे जाहीर वक्तव्य केले होते. मविआसोबतची युती तुटली तर शिवसेना उद्धव ठाकरे गट भारतीय जनता पक्षासोबत येऊ शकतो अशा चर्चांना पेव फुटले. दूरावलेले मित्र एकत्र येणार अशा अफवा पसरायला सुरुवात झाली.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युती तुटली होती. २५ वर्षांची मैत्री तुटली आणि सख्खे मित्र पक्के वैरी बनले. उध्दव ठाकरे यांनी नवे मित्र जोडले. ते महाविकास आघाडीचे घटक झाले. आघाडीत कुरबुरी असल्यातरी सत्तेसाठी हे सारे एकत्र नांदत आहेत.
अफवेने उडवली तारांबळ
सोमवारी दिवसभर चर्चेत असलेल्या या अफवेने मविआ नेत्यांचा गोंधळ उडाला. सर्वांनी एकसुरात ही अफवा भाजपने पेरल्याचे सांगीतले. संजय राऊत यांना तर आपले मन मोकळे करायला एक नवा विषय मिळाला.
षडयंत्र असल्याचा आरोप
पसरवली जाणारी अफवा एक षडयंत्र असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. यातून भाजपची भीती दिसून येत आहे असेही ते म्हणाले. आमचा लढा महाराष्ट्राला लुटणाऱ्यांचे विरोधात आहे. शिवसेना अशा ताकदीशी हातमिळवणी करणार नाही. त्यांच्याशी हातमिळवणी करणे म्हणजे औरंगजेब आणि अफझलखान यांच्याशी हातमिळवणी करण्यासारखे आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी आमच्या स्वाभीमानावर शिंतोडे उडविणारे हे लोक आहेत असा आरोप त्यांनी केला. अफवा पसरविण्यासाठी कोणी सुपाऱ्या दिल्या याची माहिती आपल्याकडे आहे. आमचीही यंत्रणा आहे असेही सांगितले.
भाजपची घाबरगुंडी उडाली
आमच्यात वाद निर्माण करण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे, त्यांची घाबरगुंडी उडाली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. मविआची युती अभेद्य आहे, आमची युती म्हणजे फेविकॉल चा मजबूत जोड आहे असेही ते म्हणाले. जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. लवकरच यादी जाहीर केली जाईल असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. कोण कुणाला साथ देणार? कोण मदत करणार? यावर चर्चा सुरू आहेत. अशातच मनसेची भूमिका महायुतीबाबत सहकार्याची राहील, असे सांगण्यात येते.
निवडक जागांवर मनसेला महायुतीचा पाठिंबा
लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता राज ठाकरे यांचा पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवित आहे. मुंबईतील काही जागांवर महायुती मनसेला पाठिंबा देणार असल्याचे बोलले जाते. याच संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतल्याचेही सांगण्यात येते. शिवडी,माहीम, वरळी या जागांवर महायुती मनसेला पाठिंबा देण्याचा विचार करित आहेत.