Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगावे की त्यांनी अदानींकडून निधी घेतला की नाही? असा परखड सवाल शिवसेना प्रवक्ते संजय निरूपम यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर मलिदा खाण्यासाठीच धारावीच्या प्रश्नावर ठाकरे गटाची उठाठेव सुरू आहे. धारावी पुनर्वसनला विरोध म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी घणाघाती टीका निरुपम यांनी केली. मुंबईच्या बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जानेवारी 2019 मध्ये महायुतीचे सरकार (Mahayuti) असताना धारावी पुनर्विकासाच्या संदर्भात टेंडर काढण्यात आले. अदानींचे टेंडर मागे पडून सेकलींक कंपनीला टेंडर मिळाले. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे सेकलींकने यातून माघार घेतली होती. 2023 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) सेकलिंकचे टेंडर रद्द केले. अदानींना वाट मोकळी करून दिली होती. कुणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला होता, याचेही उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यायला हवे. शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्योगपती अदानी यांचे सलोख्याचे संबंध संबंध भारताला माहित आहेत. त्यांचा तुमच्यावर दबाव होता का, असा प्रश्न निरुपम यांनी केला.
नव्याने ठरला मसुदा
महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर धारावी पुनर्विकासंदर्भात टेंडर नव्योन ठरले. मसुदा महाविकास आघाडीच्या मर्जीनुसार कायम ठेवला. त्यात वेगळे नियम लावण्यात आले नाहीत. अटी व शर्ती त्याच आहेत. मग विरोध कशीसाठी असा सवाल निरुपम यांनी केला. ठाकरे आता केवळ विरोधाला विरोध करीत आहेत. धारावीतील झोपडीधारकांच्या भल्यासाठीच पात्र आणि अपात्र लोकांना सरसकट घरे देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे.
महायुती सरकारच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांचा जळफळाट झाला आहे. त्यामुळे ठाकरे यांनी डिसेंबर 2023 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Lok Sabha) धारावी पुनर्विकासाच्या संदर्भात आंदोलन केले. त्यानंतर आता जुलै महिन्यात ठाकरे पुन्हा हा विषय उचलून धरत आहेत. गेले सहा महिने उद्धव ठाकरे का गप्प होते? आता पुन्हा निवडणुकीसाठी देणग्या मिळवण्यासाठी उठाठेव सुरू आहे का? अशी खरमरीत टीका निरुपम यांनी केली.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन्स क्लबचे नेते आहेत. हे पूर्णपणे खरे आहे. त्यांनी हिंदुत्व केव्हाचे सोडले आहे. मुस्लिम तुष्टीकरण ते करत आहेत. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच, धारावीतील झोपडीधारकांच्या स्वप्नांचा चुराडा करण्यासाठी ठाकरे स्वार्थी राजकारण करीत आहे. उद्धव ठाकरे टीडीआरचा बागुलबुवा करत आहेत. डेव्हलपमेंट प्लॅननुसारच टीडीआर वापरण्यात येणार आहेत. जमीन सरकारचीच असेल. अदानी समूह केवळ विकासकाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शपथ घेऊन अदानींकडून पैसे घेतले की नाही, हे जाहीर करावे असे आव्हान निरुपम यांनी दिले.