Buldhana Constituency : बुलढाणा विधानसभा मतदारसंघात झालेली निवडणूक अटीतटीची ठरली. या निवडणुकीत शिवसेनेचे संजय गायकवाड अवघ्या आठशे मतांनी विजयी झाले. काठावर पास होणे संजय गायकवाड यांच्या चांगलंच जिव्हारी लागलं आहे. अलीकडेच झालेल्या एका सत्कार कार्यक्रमात संजय गायकवाड यांनी यासंदर्भातील खदखद बोलून दाखवली. बुलढाणा विधानसभेच्या निवडणुकीत आपण एकट्याने लढलो. आपल्याला कोणीही मदत केली नाही. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपसह केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यावरही त्यांचा रोख होता.
गेल्या काही काळापासून बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड यांच्या प्रति महायुतीमध्ये नाराजी वाढत आहे. आपल्या काही कारनाम्यांमुळे संजय गायकवाड हे चर्चेत देखील आले होते. नागपूर येथील एका महिलेने संजय गायकवाड यांच्या विरोधात भूखंड बळकावल्याची तक्रार केली. त्यानंतर वाघाच्या दातावरून संजय गायकवाड यांनी स्वतःचेच हसू करून घेतले. गळ्यात असलेला एक प्लास्टिकचा दात आपण स्वतः वाघाची शिकार करून मिळवल्याचे गायकवाड म्हणाले होते. त्यावरून त्यांच्याविरुद्ध वनविभागाने कारवाई देखील सुरू केली होती. मात्र हा दात नकली निघाला.
भाजपही नाराज
संजय गायकवाड यांच्यापासून भाजपही नाराज होती. बुलढाण्यातील माजी आमदार विजयराज शिंदे यांनी गायकवाड यांच्या विरोधात बंड पुकारले होते. घाटाखालील तालुक्यांमध्ये जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे हे देखील संजय गायकवाड यांच्यावर रुसले होते. संजय गायकवाड यांच्या विरोधात झालेली बंडखोरी शांत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मध्यस्थी करावी लागली. एकनाथ गायकवाड यांनी माजी आमदार विजयराज शिंदे यांना चर्चेसाठी बोलावून घेतलं. यातच शिंदे यांचा विजय झाला. त्यानंतर संजय गायकवाड हे महायुतीमध्ये एकाकी पडले.
आपल्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे संजय गायकवाड हे सतत प्रकाशझोतात राहतात. परंतु सामान्य नागरिकांना हे काहीच नको आहे. त्यांना बुलढाण्याचा भरपूर विकास हवा आहे. अलीकडेच संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत थोर संत महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण करून घेतले. परंतु केवळ पुतळ्यांची स्थापना म्हणजे मतदारसंघाचा विकास असतो का? असा प्रश्न सगळीकडूनच उपस्थित झाला. बुलढाणा शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. मात्र या शहरांमध्ये अद्यापही पायाभूत सुविधा पाहिजे तशा नाहीत. रस्ते, पाणी, पथदिवे, क्रीडांगण, रोजगाराच्या सुविधा असं काहीच बुलढाण्यात नाही. त्यामुळे मतदारांची बऱ्यापैकी नाराजी संजय गायकवाड यांच्यावर होती. ही नाराजी फक्त 800 मतांच्या अंतराने दिसून आली आहे. यापुढे तरी संजय गायकवाड यांनी वादग्रस्त मुद्दे सोडून मतदारसंघाच्या परिपूर्ण विकासाकडे लक्ष द्यावे, असे मतदारांनी यंदा त्यांना दाखवून दिले आहे.