उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदार बाहेर पडले. आपणच खरी शिवसेना आहोत, असं त्यांनी सिद्ध केलं. आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर हळूहळू आणखी काही नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंचा हात धरला. त्यात डॉ. नीलम गोऱ्हे यांचाही समावेश आहे. त्यांना महायुतीत सामील करून घेताना विधानपरिषदेचं उपसभापतीपद देण्यात आलं. सध्या बदलापूर घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यात नीलम गोऱ्हे यांनी अहमदनगर दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.
आमदार सोडून गेल्याने ट्रॉमा
‘उद्धव ठाकरे अद्याप ट्रॉमामधून बाहेरच आले नाही. एकाचवेळी 40 आमदार आपल्याला सोडून जातील, याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. अर्थात काही आमदार जाऊ शकतात, याचा त्यांना अंदाज होता. पण एवढ्या मोठ्या संख्येने आमदार सोडून गेल्यामुळे ते ट्रॉमामध्ये गेले. आणि आजही ते त्यातून बाहेर पडलेले नाहीत,’ अशी बोचरी टीका डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. ‘ज्यावेळी आंदोलन सुरू होतं, त्यावेळी मुख्यमंत्री कोकणात राखी बांधून घेत होते. त्यांनी किमात त्या राख्यांना तरी जागायला हवं होतं. पण तसं केलं नाही. आंदोलन करणाऱ्यांच्या भेटी घेतल्या नाहीत. उलट आंदोलनामागे विरोधकांची प्रेरणा होती, असं म्हणाले. असे त्यांना वाटत असेल तर मुख्यमंत्री विकृत आहेत असेच म्हणावे लागेल,’ अशी टीका उद्धव यांनी केली होती.
त्यालाच उत्तर देताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव यांच्यावर टीका केली आहे. ‘40 आमदार सोडून गेल्याच्या ट्रॉमातून अद्याप ते बाहेरच पडलेले नाहीत. त्यामुळे ते एकच विषय प्रत्येकवेळी मांडताना दिसतात. पण आपलाच आपल्या आमदारांसोबत संवाद राहिलेला नव्हता, हे ते मान्य करीत नाहीत,’ असे त्या म्हणाल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कुर्ल्याला गेले होते का, असा सवाल त्यांनी केला आहे. ‘ते मुख्यमंत्री असताना कुर्ल्याची घटना घडली. त्यावेळी ते तिथे गेले होते का? मुख्यमंत्र्यांनी कुठे जावे, कुठे जाऊ नये. हा त्यांचा प्रश्न आहे. पण आधीचे उद्धव साहेब आणि मुख्यमंत्री झाल्यानंतरचे उद्धव साहेब यात खूप फरक होता. त्यामुळे त्यांनी आता विषयांतर न करता मुख्यमंत्र्यांप्रमाणे पीडितांच्या कुटुंबांसोबत उभं राहिलं पाहिजे,’ असं डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.