Shiv Sena : रामटेक लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने कॉंग्रेसचे आमदार राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेसच्या मतदारांचा आकर्षित केल्याशिवाय रामटेक लोकसभा मतदारसंघात विजय शक्य नसल्याचे लक्षात आल्याने महायुतीने आमदार पारवेंच्या हातात धनुष्यबाण दिल्याची सांगण्यात येत आहे. राजू पारवे उमरेड विधानसभा मतदार संघातून गेल्या निवडणुकीत विजय झाली होते. त्यांनी भाजपचे सुधीर पारवे यांचा पराभव केला होते.
महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना घटक पक्षांपैकी एक आहे. शिंदेची शिवसेना महायुतीत आहे. अशात रामटेकची जागा जिंकण्याण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोरदार प्रयत्न करीत आहेत. भाजपही यासाठी आग्रही होते. कृपाल तुमाने यांच्या नावाला भाजपचा विरोध आहे. त्यामुळे रामटेकची जागा जिंकण्यासाठी कॉंग्रेसच्या मतदारांची गरज भासणार आहे. त्यातूनच उमरेडच्या आमदारांना पक्षात घेण्याची तयारी भाजपने केली होती. परंतु रामटेकची जागा शिवसेनेकडे असल्याने पारवे यांचा पक्षप्रवेश अडकला होता. शिवसेनेकडे मदारसंघ कायम राहिल्याने पारवेंना शिंदे धनुष्यबाण हातात देण्यात आला.
उमरेड ‘फॅक्टर’ महत्वाचा
रामटेक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यातील पाच विधानसभा मतदारसंघातून महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भक्कम मतदान होणार आहे. उमरेडवर कोणत्याही उमेदवाराच्या विजयाची भिस्त असेल. हे कळल्यामुळे महायुतीमधील नेत्यांकडून ‘प्लान बी’चा वापर करण्यात आला. पारवे या मतदारसंघातून कॉंग्रेसचे किती मतदार वळविण्यात यशस्वी ठरतात, यावरच पारवे व रश्मी बर्वेचा यांचा जय-पराजय अवलंबून राहणार आहे.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाणे पसंत केले. आता त्यांनाच शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने पक्षनिष्ठेचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काँग्रेस पक्षातून आलेल्या पारवे यांना उमेदवारी दिल्याने भाजप व शिवसेनेतील कार्यकर्ते नाराज दिसत आहेत. ही नाराजी दूर करण्याचे आव्हान भाजप व शिवसेनेपुढे आहे.