‘कौन बनेगा मुख्यमंत्री?’, याचे उत्तर अद्याप महाराष्ट्राला मिळालेले नाही. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा उलटला तरी मुख्यमंत्री ठरलेला नाहीये. महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांना इतका वेळ का लागतो, असा प्रश्न सर्वानाच पडला आहे. विलंब होत असल्यामुळे यावेळीही भाजप श्रेष्ठी धक्कातंत्र अवलंबणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे शिवसेना फोडून भाजपसोबत आले होते. आधी सुरत, नंतर गुवाहाटी प्रवास करत ते आपल्या समर्थक आमदारांसोबत मुंबईला पोहोचले. त्यावेळी हे सर्व घडवून आणणारे मास्टर माईंड देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे चित्र सर्वत्र तयार झाले होते. पण ऐन वेळेवर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा करण्यात आली. आश्चर्यकारकरित्या या घडामोडी घडल्या. ‘मी मंत्रिमंडळात नसेन, पण सरकारसोबत आहे’, असे वक्तव्य तेव्हा फडणवीसांनी केले होते. पण नंतर शिर्षस्थ नेत्यांच्या आदेशावरून त्यांनी मुख्यमंत्रिपद स्विकारले.
मुख्यमंत्रीपदाबाबत माझी अडचण नाही
यावेळी महायुतीला जोरदार यश मिळाले आहे. स्पष्ट बहुमतात महायुती आली आहे. सत्तास्थापनेला आता विलंब लागणार नाही, असे चित्र असताना आठवडा उलटूनही मुख्यमंत्री ठरलेला नाही. त्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनात नेमके काय, असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. ‘मुख्यमंत्री निवडण्याच्या प्रक्रियेत माझी कुठलीही अडचण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना फोन करून तसे कळवले आहे’, असे एकनाथ शिंदे यांना परवा-परवा सांगितले. तर अजित पवार यांनी आधीच फडणवीस यांना पाठिंबा घोषीत करून टाकला.
मग आता मुख्यमंत्री निवडण्यात अडचण काय, असा प्रश्न आहे. दरम्यान एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा मागील दिवसांत सुरू झाल्या. शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारतील, पण त्यांना गृह खातं हवंय, अशी मागणी काल रातोरात समोर आली. या पृष्ठभूमीवर भरत गोगावले यांचे महत्वाचे वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले, ‘मागील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे गृह खाते होते. तर यावेळी आम्हाला उपमुख्यमंत्रिपद मिळणार असेल, तर गृह खातं आम्हाला मिळायला पाहिजे, ही आमची मागणी गैर नाही.’ गोगावलेंच्या या मागणीमुळे एकनाथ शिंदे गृहमंत्रिपदावर अडून बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. यातून अमित शाह यांना तोडगा काढावा लागणार आहे.
शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले, ‘एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा अडचणीत येतात, तेव्हा तेव्हा ते त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी जातात. तेथे शांत चित्ताने ते निर्णय घेतात. तेथे त्यांचा फोनही लागत नाही. त्यामुळे ते शेतीवाडीत निवांत असतात. जेव्हा जेव्हा अशा परिस्थितीत ते दरे या गावी गेलेले आहेत, तेव्हा तेव्हा त्यांनी मोठे निर्णय घेतलेले आहेत. यावेळीही ते काहीतरी मोठा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.’ सद्यस्थितीवर शिरसाट यांच्या या वक्तव्याला महत्व प्राप्त झालं आहे. शिंदे खरंच मोठा निर्णय घेतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.